पुणे : शिवाजीनगर कोर्टाच्या बाहेर खुनाचा प्रयत्न करणाऱ्या आरोपीला पुणे येथील जिल्हा व सत्र न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. जिल्हा व सत्र न्यायालयाचे न्यायाधीश के. पी. नांदेडकर यांनी हा जमीन मंजूर केला आहे. अशी माहिती आरोपीचे वकील अॅड.नितीन भालेराव यांनी दिली. झम्ब्या उर्फ अन्वर शाकिर शेख असे जामीन मंजूर झालेल्या आरोपीचे नाव आहे.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, 12 एप्रिलला शिवाजीनगर कोर्टात फिर्यादी हे कामानिमित्त आले होते. त्या ठिकाणी आरोपी झम्ब्या उर्फ अन्वर व ओंकार पवार आणि आणखी एक असे तिघेजण मोक्काच्या केसच्या तारखेला कोर्टात आले होते. यावेळी आरोपी झम्ब्या उर्फ अन्वर याने फिर्यादीच्या मामाच्या मुलावर 2021 मध्ये कोयते व तलवारीने वार केले होते. त्यावेळी आरोपी झम्ब्या याच्यावर मोक्का कायद्यान्वये कार्यवाही करण्यात आली होती. त्यातून काहीच दिवसांपूर्वी झम्ब्या जामिनावर बाहेर आला होता.
कोर्टा बाहेर फिर्यादी याला पाहून आरोपी झम्ब्या याने तुझे दोन तीन वेळा खूप नाटक झाले आहे, असे म्हणून त्याच्या हातातील गाडीची चावी फिर्यादी याच्या कानामागे रोवली. यावेळी फिर्यादी खाली पडल्यावर तिन्ही आरोपींनी त्यांच्याकडील कोयत्याने फिर्यादीस मारहाण चालू केली. परंतु काही वेळाने आजुबाजूचे लोक जमल्याने आरोपी पळून गेले होते. यावेळी त्याठिकाणी असलेल्या नागरिकांनी पोलिसांना फोन केला व खुनाचा प्रयत्न करणे व इतर कलमांच्या अन्वये आरोपी झम्ब्या व इतर दोघांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता.
दरम्यान, आरोपींना अटक करून त्यांची रवानगी येरवडा कारागृहात केली होती. येरवडा कारागृहात असताना आरोपी झम्ब्या उर्फ अन्वर शेख याने अॅड. नितीन भालेराव यांच्या मार्फत पुणे येथील जिल्हा व सत्र न्यायालयात जामिनाचा अर्ज दाखल केला होता. आरोपी आणि सरकार पक्षाचा युक्तिवाद ऐकून पुणे येथील जिल्हा व सत्र न्यायाधीश के. पी. नांदेडकर यांनी आरोपीस अटी व शर्थींवर जामीन मंजूर केला आहे. अशी माहिती आरोपीचे वकील अॅड. नितीन भालेराव यांनी दिली. या कामी अॅड. मयूर चौधरी, अॅड. मिथिल बुरांडे, अॅड.स्वप्नील दाभाडे, अॅड.दीपक खेडकर यांनी मदत केली.