केडगाव : दौंड तालुक्यातील वनविभागाच्या देलवडी बिट मधील एकेरीवाडी या गावातील चंद्रकांत बोधे या मेंढपाळच्या बकरीवर रात्री अचानक बिबट्याने हल्ला करत एका बकरीला ठार केले. त्या बकरीला घेऊन अंधाराचा फायदा घेत बिबट्याने पलायन केले.
त्यानंतरही बिबट्या रात्री परत आला होता पण तेवढ्यात मेंढपाळांनी आरडाओरडा केला असता त्या ठिकाणाहून बिबट्याने पलायन केले. हा प्रकार रात्र भर सुरु असल्याची माहिती मेंढपळांनी दिली. या घटनेची माहिती देण्यासाठी स्थानिकांनी वनविभागाच्या कर्मचार्यास संपर्क साधला असता वन विभागाचे कर्मचार्यांने ठार झालेल्या बकरी चा शोध घेत पंचनामा केला.
दौंड तालुक्यातील वनविभागाच्या काही बिटमध्ये काही दिवसांपूर्वी या शेतशिवारात बिबट्याने पाळीव प्राण्यांच्या वर हल्ला करून ठार केले आहेत. ही घटना ताजी असताना पुन्हा एकदा बिबट्याने बकरीवर हल्ला केल्यामुळे घबराट पसरली आहे. एकेरीवाडी देलवडी गावातील परिसरात महिनाभरात चौथ्यांदा बिबट्याने पाळीव प्राण्यांची शिकार केली आहे. त्यामुळे या परिसरात मोठी घबराट पसरली आहे.
वनविभागाकडे पिंजरे लावण्याची मागणी
देलवडी एकेरीवडी परिसरात यापूर्वीसुद्धा बिबट्याच्या अनेक ठिकाणी पाऊलखुणा आढळत आहेत. त्यामुळे या परिसरातील ग्रामस्थांमध्ये आधीच दहशतीचं वातावरण असून त्यात आता या झालेल्या घटनेमुळे भर पडली आहे. बिबट्या वारंवार हल्ले करत असल्याने बिबट्याला पकडण्यासाठी वनविभागाकडे तत्काळ पिंजरे लावण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे. मात्र याकडे वनविभाग गांभीर्याने लक्ष देत नसल्याची ग्रामस्थांचे म्हणणे आहे.
मेंढपाळ चंद्रकांत बोधे म्हणाले, बिबट्याचा त्रास आता खूप व्हायला लागला असून रात्री मारलेल्या बकरीमुळे माझे 15 ते 20 हजारांचे नुकसान झाले आहे. पंचनामा जरी झाला असला तरी नुकसान भरपाई मिळेल तेव्हा खरी. कारण आता पर्यंत माझ्या चार बकरी व माझ्यासोबत असलेल्या मेंढपाळांच्या आठ दहा बकरी बिबट्याने मारल्या आहेत. त्यामुळे एकेरीवाडी देलवडी परिसरात पिंजरा लावणे फार गरजेचे आहे. कारण बिबट्या आम्हाला दिवसाही अनेकदा दिसतो. बकऱ्या चरण्यासाठी आम्हाला रानावनात जावे लागते यामुळे आमची खूप मोठी तारांबळ होत असून आता बकऱ्या चारण्याचा मोठा प्रश्न आहे निर्माण झाला आहे.