पिंपरी: जमीन विकसनासाठी घेतल्यानंतर ठरल्याप्रमाणे जागा मालकाला त्यांचा मोबदला न देता त्यांची सहा कोटी ६४ लाख रुपयांची फसवणूक केली. या प्रकरणी गुरुवारी (दि.३०) चिखली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. हनुमंत निवृत्ती जाधव (वय ५८, रा. जाधववाडी, चिखली) यांनी याप्रकरणी चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार ए. व्ही कापोर्रेशन तर्फे सागर बबनराव मारणे (रा. आकुर्डी), संदीप राम पवळे (रा. चिंचवड) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हा प्रकार ३० डिसेंबर २०१३ ते ३० मे २०२४ या कालावधीत जाधववाडी, चिखली येथे घडला. फिर्यादी यांची जाधववाडी येथे वडिलोपार्जित ३७ गुंठे जमीन आहे. ती जमीन त्यांनी आरोपींना विकसन करारनामा, कुलमुखत्यारपत्राद्वारे लिहून दिली. त्या जमिनीवर उभारलेल्या बांधकामातील ५६ टक्के हिस्सा आरोपी यांचा आणि ४४ टक्के हिस्सा फिर्यादींचा असे ठरले होते. फिर्यादी यांनी त्यांच्या हिस्स्याचे बांधकाम विकण्यासाठी आरोपींना एजंट म्हणून अधिकार दिले. आरोपींनी फिर्यादी यांच्या हिस्स्याच्या सदनिका विकून त्यातून आलेली रक्कम फिर्यादींना दिली नाही. तसेच एका महिलेला विकलेल्या सदनिकेची रक्कम देखील आरोपींनी फिर्यादी यांना न देता त्यांची सहा कोटी ६४ लाख चार हजार ३१२ रुपयांची फसवणूक केल्याचे फिर्यादीत नमूद आहे. चिखली पोलीस तपास करीत आहेत.