पुणे : लग्नाचे आमिष दाखवून एका अल्पवयीन मुलीला पळवून नेऊन तिच्यावर वारंवार बलात्कार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. याप्रकरणी हडपसर पोलिसांनी लोणी काळभोर येथील एका तरुणावर गुन्हा दाखल करुन अटक केली आहे. हा प्रकार 1 मार्च 2024 ते 31 मे 2024 या कालावधीत पुणे शहर आणि परिसरात वेळोवेळी घडला आहे.
याप्रकरणी 16 वर्षीय अल्पवयीन मुलीने शुक्रवारी 31 मे रोजी हडपसर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरून परमेश्वर राजाभाऊ देडे (वय-21 रा. माळी मळा, लोणी काळभोर, मुळ रा. नवीन रेणापुर नाका, आर्वी गायरान, लातुर) याच्यावर गुन्हा दाखल करुन अटक केली आहे.
हडपसर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने पिडीत मुलीसोबत ओळख केली. मुलगी अल्पवयीन असल्याचे माहित असतानाही तिला लग्नाचे आमिष दाखवले. तसेच तिच्यावर वेळोवेळी वेगवेगळ्या ठिकाणी नेऊन शारीरिक संबंध ठेवले. त्यानंतर 1 मार्च रोजी मुलीला पळवून नेले. तिला लग्नाचे आमिष दाखवून तिच्यावर वारंवार लैंगिक अत्याचार केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. पुढील तपास हडपसर पोलीस करीत आहेत.