नवी दिल्ली: अनेक आर्थिक नियम दर महिन्याला बदलतात. जून महिन्यातही अनेक नियम बदलणार आहेत. जून महिन्यात बँक सुट्ट्या, आधार कार्ड अपडेट आणि ड्रायव्हिंग लायसन्सशी संबंधित नियमांमध्ये बदल होणार आहेत. या बदलांचा थेट परिणाम सर्वसामान्यांच्या खिशावर होणार आहे. जाणून घेऊया 1 जूनपासून कोणते नियम बदलणार आहेत?
एलपीजी आणि पेट्रोलियम पदार्थांच्या किमतीत कोणताही बदल नाही
दर महिन्याच्या पहिल्या दिवशी एलपीजी सिलिंडर आणि इतर पेट्रोलियम पदार्थांच्या किमती नव्याने ठरवल्या जातात. महिन्याच्या शेवटच्या दिवशी मध्यरात्री पेट्रोलियम कंपन्या याची घोषणा करतात. अशा परिस्थितीत 1 जून 2024 रोजी पेट्रोलियम कंपन्या एलपीजीसह पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत बदल करतील अशी अपेक्षा होती, मात्र तसे झाले नाही. यापूर्वी मे महिन्यात पेट्रोलियम कंपन्यांनी व्यावसायिक सिलिंडरच्या दरात कपात केली होती. एक जूनपासून दीर्घकाळ स्थिर असलेल्या पेट्रोल आणि डिझेलच्या दरात बदल होईल, अशी अपेक्षा होती, मात्र तसे झाले नाही.
ड्रायव्हिंग लायसन्ससाठी आरटीओला जाण्याची गरज नाही
आजपासून म्हणजेच 1 जूनपासून नवीन वाहतुकीचे नियम लागू होत आहेत. नव्या महिन्यात ड्रायव्हिंग लायसन्स काढण्यासाठी आरटीओमध्येच परीक्षा देणे आता बंधनकारक राहणार नाही. अशा स्थितीत ड्रायव्हिंग लायसन्सची परीक्षा उत्तीर्ण होण्याची प्रक्रिया आता सोपी होण्याची अपेक्षा आहे. 1 जूनपासून तुम्ही सरकार मान्यताप्राप्त खासगी संस्थांमध्येही ड्रायव्हिंग टेस्ट देऊ शकता. यामुळे लोकांना ड्रायव्हिंग लायसन्सची चाचणी देण्यासाठी आरटीओला जाण्याची गरज नाही.
वाहतुकीचे नियम कडक असतील
नवीन वाहतूक नियमांनुसार वाहतुकीचे नियम अधिक कडक करण्यात येत आहेत. 18 वर्षांखालील व्यक्तींनी वाहन चालवल्यास किंवा वाहतूक नियमांचे उल्लंघन केल्यास 25,000 रुपयांपर्यंत दंड होऊ शकतो. वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन केल्यास परवाना रद्द तर होईलच, पण 25 वर्षांसाठी नवीन परवानाही दिला जाणार नाही. वाहतूक नियमांचे उल्लंघन केल्यास 1000 ते 2000 रुपये, लायसन्सशिवाय वाहन चालवल्यास 500 रुपये, हेल्मेट न घातल्यास 100 रुपये दंड आकारण्याची तरतूद केली आहे.
14 जूनपर्यंत तुम्ही मोफत आधार अपडेट करता येणार
युनिक आयडेंटिफिकेशन ऑथॉरिटी ऑफ इंडिया म्हणजेच UIDAI च्या मते, जर तुम्ही तुमचे आधार कार्ड 10 वर्षांपासून अपडेट केले नसेल तर तुम्ही 14 जूनपर्यंत ते मोफत करू शकता. आधार कार्ड अपडेट करण्याची प्रक्रिया UIDAI पोर्टलवर 14 जून 2024 पर्यंत मोफत आहे. जर तुम्ही 14 जूननंतर तुमचे आधार कार्ड अपडेट केले, तर तुम्हाला त्यासाठी काही शुल्क भरावे लागेल. तुम्ही घरी बसून किंवा आधार कार्ड केंद्राला भेट देऊन तुमचे आधार कार्ड अपडेट करू शकता. तुम्ही तुमचे आधार कार्ड अपडेट करण्यासाठी आधार कार्ड केंद्रावर गेल्यास तुम्हाला 50 रुपये शुल्क भरावे लागेल. त्याचवेळी, सध्या UIDAI पोर्टलवर जाऊन आधार कार्ड अपडेट करण्यासाठी कोणतेही शुल्क भरावे लागणार नाही.
जून महिन्यात 14 दिवस बँका बंद राहणार
जून महिन्यात बकरी ईद, वट सावित्री पौर्णिमा यासह विविध सणांच्या निमित्ताने सार्वजनिक व साप्ताहिक सुटी असल्याने अनेक दिवस बँका बंद राहणार आहेत. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या अधिकृत वेबसाइटवर दिलेल्या माहितीनुसार, जूनमध्ये एकूण 12 दिवस बँक बंद राहतील. लोकसभा निवडणुकीच्या सातव्या टप्प्यातील मतदानामुळे पहिल्या 1 जून रोजी अनेक राज्यांतील काही भागात बँक बंद राहतील. बँकेच्या शाखा बंद असताना तुम्ही बँकेत जाऊन कोणत्याही सेवेचा लाभ घेऊ शकणार नाही. अशा परिस्थितीत बँकेच्या सुट्ट्या लक्षात घेऊन बँकिंगशी संबंधित कामाचे नियोजन केले, तर ते उपयुक्त राहणार आहे.
पॅन-आधार लिंक न केल्यास बसणार फटका
आयकर विभागाने नुकत्याच केलेल्या निवेदनात करदात्यांना 31 मे पर्यंत त्यांचा स्थायी खाते क्रमांक (PAN) आधारशी लिंक करण्यास सांगितले आहे. 1 जूनपासून सामान्य दराच्या दुप्पट दराने टॅक्स डिडक्टेड ॲट सोर्स (टीडीएस) कपात करणे बंधनकारक करण्यात आले आहे.