पुणे : राज्याच्या उंबरठ्यावर मान्सून आला आहे, तरी विदर्भात उष्णतेच्या लाटा सुरूच आहेत. विदर्भातील चंद्रपूर येथे शुक्रवारी (दि. ३१) सर्वाधिक ४५.२ अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झाली आहे. तर, पुढील २४ तासांत चंद्रपूरसह नागपूर, वर्धा, भंडारा, गडचिरोली आणि गोंदिया जिल्ह्यात उष्णतेची तीव्र लाट येण्याची शक्यता भारतीय हवामानशास्त्र विभागाने वर्तविली आहे.
नैऋत्य मोसमी पाऊस (मान्सून) केरळमध्ये दाखल झाला आणि कोकण परिसरात पावसाला सुरुवात झाली. केरळमधून मान्सूनच्या पुढील वाटचालीमध्ये प्रगती असल्यामुळे येत्या सात दिवसांत मान्सून महाराष्ट्रात दाखल होईल. त्यामुळे मान्सून उंबरठ्यावर असतानाही विदर्भाला दिवसेंदिवस आणखीनच उष्णतेच्या झळा बसत आहेत. मागील दोन आठवड्यांपासून विदर्भात उष्णतेच्या लाटेने अंगाची लाहीलाही झाली आहे. तर, पुढील दोन ते तीन दिवस चंद्रपूर, नागपूर, वर्धा, भंडारा, गडचिरोली, गोंदिया या जिल्ह्यांमध्ये उष्णतेच्या लाटेची शक्यता वर्तविली आहे. त्यामुळे या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे.