पिंपरी : कोणतीही खबरदारी न घेता धोकादायकपणे मोठ्या सिलिंडरमधून लहान सिलिंडरमध्ये गॅस चोरी केल्याप्रकरणी सांगवीमध्ये कारवाई करण्यात आली आहे. यामध्ये दोन तरुणांवर गुन्हा नोंदविण्यात आला असून, त्यांच्याकडून दोन लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. ही कारवाई बुधवारी (दि. २९) दुपारी अमली पदार्थ विरोधी पथकाने केली. विकासकुमार शंकरलाल (वय २३), पवनकुमार लाडूराम (वय २०, दोघे रा. पिंपळे गुरव. मूळ रा. राजस्थान) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी पोलीस अंमलदार अशोक गारगोटे यांनी सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
आरोपींनी घरगुती वापराच्या मोठ्या सिलिंडरमधून अवैधरीत्या तसेच कोणतीही खबरदारी न घेता रिफिलिंगच्या सहाय्याने चोरून गॅस लहान सिलिंडरमध्ये भरला. याबाबत माहिती मिळाल्यानंतर अमली पदार्थ विरोधी पथकाने कारवाई करत नऊ घरगुती वापराचे गॅस सिलिंडर, गॅस रिफील करण्याचे साहित्य, डिजिटल वजन काटा, दोन मोबाईल आणि एक टेम्पो असा एकूण दोन लाख नऊ हजार ९१० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. सांगवी पोलीस तपास करीत आहेत.