पुणे : पुण्यात खुनाच्या घटनांमध्ये वाढ होताना दिसत आहे. अशातच आता चेष्टा मस्करी करण्यातून मित्राला बेदम मारहाण करुन तरुणाचा खून केल्याची धक्कादायक घटना रामटेकडी इंडस्ट्रीयल एरिया परिसरात घडली आहे. ही घटना २७ मे रोजी सायंकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास उघडकीस आली. याप्रकरणी वानवडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करून चार जणांना अटक केली आहे.
मंगेश मधुकर बामणे (वय-३६ रा. गोसावी वस्ती, हडपसर) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी सागर राजु शितोळे (वय-२५), रोहित ज्ञानेश्वर गायकवाड (वय-२५), विशाल राजु शितोळे (वय-२८) आकाश जयसिंग चव्हाण (वय-२१ सर्व रा. स.नं. १०६, गोसावी वस्ती, हडपसर, पुणे) यांच्यावर गुन्हा दाखल करुन अटक केली आहे. याबाबत यमुना मधुकर बामने (वय-५५) यांनी वानवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
वानवडी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी आणि फिर्य़ादी यांचा मुलगा मंगेश एकमेकांचे मित्र आहेत. २७ मे रोजी सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास मंगेश आणि त्याचे मित्र व्हि मॅक कंपनीसमोरील रोडवर टेकडीच्या पायथ्याला बोलत थांबले होते. यावेळी ते एकमेकांची चेष्टा मस्करी करत होते. आरोपींनी संनमतकरुन मंगेश सोबत चेष्टा करण्यास सुरुवात केली. त्याला खाली पाडून लाथाबुक्क्यांनी जबर मारहाण केली.
त्याच्या तोंडावर व डोक्यावर मारहाण केल्याने मंगेश गंभीर जखमी झाला. त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, त्याचा उपचार सुरु असताना मृत्यू झाला. वानवडी पोलिसांनी चार जणांवर खुनाचा गुन्हा दाखल करुन अटक केली आहे. पुढील तपास पोलीस करत आहेत.