दौंड (पुणे) : दौंड पोलीस ठाण्याच्या हद्दीतून २ लाख रूपये किमतीच्या दोन म्हसान जातीच्या म्हशी चोरणाऱ्या दोघांना दौंड पोलिसांनी २४ तासाच्या आत ताब्यात घेतले आहे. सुमित मिनीनाथ चितारे (वय २४, रा. आलेगाव, ता. दौंड) व अंकुश नाना जाधव (वय ३६, मुळ रा. पेडगाव, ता. श्रीगोंदा, जि. अहमदनगर सध्या रा. आलेगाव काळेवाडी, ता. दौंड) अशी गुन्हा दाखल करून अटक करण्यात आलेल्या दोघांची नावे आहेत.
दौंड पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दौंड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील आलेगाव (ता. दौंड) येथील शेतकरी प्रमोद सुभाष काळे (वय ३१) यांच्या शेतातील गोठ्यातून २ लाख रूपये किमतीच्या दोन काळया रंगाच्या म्हसान जातीच्या म्हशी अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना मंगळवारी (ता. २८) घडली होती. याप्रकरणी दौंड पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात दौंड पोलीस ठाण्यात काळे यांनी फिर्याद दिली होती.
दौंड पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संतोष डोके यांनी याप्रकरणी तपास पथक तयार केले. सदर घटनेचा दौंड पोलीस तपास करीत असताना संतोष डोके यांना गुप्त बातमीदारामार्फत बातमी मिळाली की, आलेगाव येथील काळेवस्ती येथे ओढयाच्या कडेला म्हशी बांधलेल्या अवस्थेत आहेत. सदर ठिकाणी जात पोलिसांनी पाहणी केली असता दोघेजण त्या ठिकाणी आढळून आले. त्यांच्याकडे चौकशी केली असता त्यांनी त्यांचे नाव सुमित चितारे व अंकुश जाधव असल्याचे सांगितले. त्यांच्याकडे गुन्ह्याच्या अनुषंगाने तपसणी केली असता त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली.
दरम्यान, त्यांच्याकडून पोलिसांनी गुन्ह्यातील म्हसान जातीच्या २ लाख रूपये किमतीच्या दोन म्हशी हस्तगत केल्या आहेत. आरोपींना कोर्टात हजर केले असता कोर्टाने दोघांना शनिवार (ता. ०१) पर्यंत पोलीस कोठडी दिली आहे.
सदरची कारवाई दौंड विभागचे पोलीस उपविभागीय अधिकारी स्वप्नील जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संतोष डोके, सहायक पोलीस फौजदार संतोष शिंदे, पोलीस हवालदार पांडुरंग थोरात, सुभाष राउत, नितिन बोराडे, पोलीस नाईक निखिल जाधव, अमीर शेख, चालक जगताप यांनी केली आहे. पुढील अधिक तपास पोलीस नाईक निखिल जाधव हे करीत आहेत.