पिंपरी : मागील दीड वर्षांपूर्वी ब्रेकअप झालेले असताना तरुणाने तरुणीला रस्त्यात अडवून मोकळ्या रस्त्यावर नेऊन तिच्या गळ्यावर आणि हातावर धारदार शस्त्राने वार करुन गंभीर जखमी केले. तसेच तिला जातीवाचक शिवीगाळ ही करण्यात आली. हा प्रकार सोमवारी (ता.27) सायंकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास किवळे येथील रुणाल गेटवे सोसायटीजवळील परिसरात घडला आहे.
याप्रकरणी आसिफ मोहम्मद शेख (वय 24, रा. किवळे) याला रावेत पोलिसांनी अटक केली आहे. जखमी 19 वर्षीय तरुणीने रावेत पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. याप्रकरणी रावेत पोलीसांनी एका तरुणावर गुन्हा दाखल करुन अटक केली आहे.
यावेळी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गेल्या दीड वर्षापासून आरोपी आणि फिर्यादी यांच्यात प्रेमसंबंध होते. मात्र, मुलीने आरोपीसोबत असलेले प्रेमसंबंध संपवले होते. याचा राग आरोपीच्या मनात होता. सोमवारी सायंकाळी तरुणी कामावरून घरी जात असताना रुणाल गटवे सोसायटीच्या मागील मोकळ्या रानातील रस्त्यावर आरोपीने तिला अडवले. प्रेमसंबंध संपवल्याच्या कारणावरुन तिला जातीवाचक शिवीगाळ करुन मारहाण केली. तिला जीवे मारण्याच्या उद्देशाने गळा दाबून धारदार शस्त्राने गळ्यावर व हातावर वार करुन जीवे मारण्याचा प्रयत्न केला.
याबाबत जखमी झालेल्या तरुणीने रावेत पोलीस ठाण्यात तक्रार दिली. पोलिसांनी गुन्हा दाखल करुन आरोपीला अटक केली आहे. पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक राहुल कुंभार करीत आहेत