नाशिक : अंबड पोलीस ठाण्याच्या हद्दीत पाचशे रुपयांच्या बनावट नोटा विक्री करणाऱ्या रॅकेटचा पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. पोलिसांना सापळा रचून ही कारवाई केली आहे. याप्रकरणी तिघांना अंबड पोलिसांनी अटक केली असून तर एक जण फरार झाला आहे. फरार आरोपीच्या शोधासाठी पोलिस पथके रवाना करण्यात आली आहेत. या कारवाईत पाचशे रुपये किमतीच्या बनावट तीस नोटा जप्त केल्या आहेत.
अशोक अण्णा पगार (वय-45, मु. पो. मेंढी ता. सिन्नर जि. नाशिक), हेमंत लक्ष्मण कोल्हे (वय- 32, मुळ रा. सिडको, सध्या रा. सेक्टर नंबर 10, आनंद निवास, वाशी, नवी मुंबई), नंदकुमार तुकाराम मुरकुटे (वय-52, रा. संजीवनी हॉस्पिटल मागे, सोनार गल्ली, ता. सिन्नर ,जि. नाशिक) अशी अटक करण्यात आलेल्या संशयित आरोपींची नावे आहेत. तर चौथा संशयित भानुदास वाघ (रा. नांदूर शिंगोटे) हा फरार झाला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, अशोक पगार हा नकली नोटा चलनात आणणार असून त्यासाठी तो येणार असल्याचे पोलीस अंमलदार संदीप भुरे यांना समजले. ही माहिती भुरे यांनी वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिलीप ठाकूर व पोलीस निरीक्षक गुन्हे सुनील पवार यांना दिली. त्या माहितीच्या आधारे त्यांनी सहाय्यक पोलीस निरीक्षक के.टी. रौंदळे, अंमलदार किरण गायकवाड, संदीप भुरे, सागर जाधव, राहुल जगझाप, घनश्याम भोये, सुचितसिंग सोळुंके, राकेश पाटील,पवन परदेशी, मते, राठोड, सचिन करंजे यांचे पथक तयार करून माऊली लॉन्स येथे सापळा रचला.
दरम्यान, अशोक पगारे हा माऊली लॉन्स येथे आला असता पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. यावेळी त्याची झडती घेतली असता त्याच्याकडे पाचशे रुपये किमतीच्या बनावट ३० नोटा आढळून आल्या. यावरून पोलिसांनी त्याला अटक केली. त्यानंतर त्याची चौकशी केली असता या गुन्ह्यात हेमंत कोल्हे, नंदकुमार मुरकुटे व भानुदास वाघ यांनी सिन्नर येथील एका हॉटेलमध्ये बनावट नोटा बनवल्याची माहिती दिली.
यावरून पोलिसांनी गुन्हे प्रकटीकरणाचे अधिकारी व अंमलदारांचे दोन तपास पथके तयार करून संशयित आरोपी हेमंत कोल्हे याला नाशिक मधून, तर नंदकुमार मुरकुटे याला सिन्नर येथून सापळा रचून अटक केली. तर चौथा संशयित भानुदास वाघ हा फरार झाला. पुढील तपास अंबड पोलीस करत आहेत.