पुणे : शहरातील कमाल तापमानात सोमवारी (दि. २७) मोठी घट झाली आहे. पारा थेट सहा अंशांनी घरसला असून, २९.९ अंश सेल्सिअस इतके नीचांकी तापमान नोंदविले. दिवसभर ढगाळ हवामान होते. त्यामुळे उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांना दिलासा मिळाला. दरम्यान, शहरात आकाश ढगाळ राहणार असून, मेघगर्जनेसह पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
मागील काही दिवसांपूर्वी उष्णतेचा पारा ४३ अंशांवर पोहोचला होता. मात्र, त्यानंतर ढगाळ हवामान, पाऊस यामुळे त्यात घट झाली. २१ मे रोजी ४०.६ अंशांपर्यंत तापमान उतरले होते. त्यानंतर रविवारी ते ३५.७ अंशांवर आले होते. त्यात सोमवारी मोठी घट होऊन ते २९.९ अंशांपर्यंत घरसले. चक्रीवादळ आणि कमी दाबाच्या पट्ट्याचा परिणाम् राज्यासह शहराच्या वातावरणावर झाला आहे. त्यामुळे दिवसभर उन्हाचा चटका कमी होता. त्यामुळे थंडावा जाणवत होता. तसेच वारेही वाहत होते. किमान तापमान २५.९ अंश सेल्सिअस होते. आज (दि. २८) व उद्या (दि. २९) मे रोजी दुपारनंतर आकाश ढगाळ राहणार आहे. तर, ३० व ३१ मे रोजी मेघगर्जनेसह पावसाची शक्यता आहे.