हडपसर, (पुणे) : दारु पित असताना एका महिन्यापुर्वी झालेल्या किरकोळ भांडणाचा राग मनात धरुन मित्रानेच मित्राचा खून केल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले आहे. मांजरी फार्म, शेवाळवाडी येथे झालेल्या खुनाची उकल करण्यात हडपसर पोलिसांना यश आले आहे.
राहुल दत्तात्रय घुले (वय ४१, रा. मांजरी फार्म- शेवाळवाडी, काळुबाई मंदिराच्या जवळ, ता. हवेली जि. पुणे) असे खून करणाऱ्या आरोपीचे नाव आहे. तर संतोष भास्कर आडसुळ (वय ४१, रा. शिवचैतन्य कॉलनी लेन नं ५ शेवाळवाडी, मांजरी) असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. याप्रकरणी संतोषचे वडील भास्कर आडसूळ यांनी हडपसर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती.
हडपसर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष पांढरे यांनी दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी (ता. २५) मांजरी फार्म शेवाळवाडी, मांजरी या ठिकाणी उमेश जगताप यांच्या मालकीचे बांधकाम सुरु असलेल्या एका खोलीमध्ये भास्कर आडसुळ यांचा मुलगा संतोष आडसुळ व आरोपी राहुल घुले हे दोघे एकत्र दारु पित होते. एक महिन्यापूर्वी दोघांमध्ये भांडण झाले होते. दारू पीत असताना मागील भांडणाचा राग मनात धरुन राहुल घुले याने संतोष आडसुळ यास हाताने मारहाण केली. तसेच उचलून जमिनीवर आपटत जीवे ठार मारले होते. याबाबत हडपसर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
दरम्यान हडपसर पोलिसांनी आरोपी राहुल घुले यास तांत्रिक आणि गुप्त माहितीदाराच्या मदतीने हडपसर भागातून ताब्यात घेतले. त्याच्याकडे गुन्ह्याच्या अनुषंगाने चौकशी केली असता त्याने संतोष आडसुळ याचा खून केला असल्याची कबुली दिली. सदर गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस निरीक्षक (गुन्हे) मंगल मोढवे हे करित आहेत.
सदरची कामगिरी हडपसर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष पांढरे, पोलीस निरीक्षक गुन्हे मंगल मोढवे, उमेश गित्ते यांच्या सूचनेप्रमाणे तपास पथकाचे सहाय्यक पोलिस निरीक्षक अर्जुन कुदळे, पोलीस उप निरीक्षक महेश कवळे, पोलीस अंमलदार, सुशील लोणकर, संदीप राठोड, समीर पांडुळे, सचिन जाधव, ज्योतिबा पवार, प्रशांत दुधाळ, निखिल पवार, प्रशांत टोणपे, अजित मदने, अमोल दणके, चंद्रकांत रेजितवाड, भगवान हंबर्डे, सचिन गोरखे, अमित साखरे, कुंडलिक केसकर, रामदास जाधव, अनिरुद्ध सोनवणे, अमोल जाधव यांच्या पथकाने केली आहे.