पुणे: पुणे शहरातील कल्याणीनगर परिसरातील पोर्शे कार अपघात प्रकरणात आता एक मोठी कारवाई करण्यात आली आहे. आरोपी अल्पवयीन तरुणाच्या ब्लड रिपोर्टमध्ये फेरफार केल्याप्रकरणी ससून रुग्णालयाच्या फॉरेन्सिक लॅबचे प्रमुख डॉ. अजय तावरे आणि डॉ. श्रीहरी हाळनोर यांना यांना पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने केली अटक केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अपघातानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी आरोपीची पोलिसांनी ससून रुग्णालयात वैद्यकीय तपासणी केली होती. त्यावेळी त्याच्या रक्ताचे नमुने जे तपासणी करण्यासाठी घेण्यात आले होते. त्यावेळी ससून रुग्णालयामध्ये ड्युटीवर असलेले सीएमओ डॉ. श्रीहरी हाळनोर आणि डॉ. अजय तावरे यांनी आरोपीच्या रक्ताचे नमुने बदलल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. त्यामुळे आरोपीचा पूर्ण ब्लड रिपोर्ट बदलला गेला. या रिपोर्टमुळे या केसची पूर्ण दिशाच बदलण्याची शक्यता होती.
परंतु, सुदैवाने पोलिसांनी दुसऱ्यांदा त्या मुलाचे ब्लड सॅम्पल घेऊन ठेवलेले होते. त्या सॅम्पलची डीएनए चाचणी देखील करण्यात आली आहे. त्यानंतर हा धक्कादायक प्रकार उघड झाला आहे. पुणे गुन्हे शाखेच्या पोलिसांनी रविवारी संध्याकाळी कारवाईची सविस्तर योजना आखत तावरे व हाळनोर या दोघांना पहाटे त्यांच्या घरामधून अटक केली. या कारवाईमुळे पुण्यातील वैद्यकीय क्षेत्रात पुन्हा एकदा खळबळ माजली आहे.
दरम्यान गेल्या काही दिवसांपूर्वी ड्रग्स माफिया ललित पाटील प्रकरणात देखील ससून रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. संजीव ठाकूर यांचा कथित सहभाग उघड झाला होता. त्यानंतरही ससून रूग्मलयामध्ये गैरप्रकारांची मालिका सुरूच आहे. डॉ अजय तावरे यांना काही दिवसांपूर्वी एक रुग्ण उंदीर चावून दगावल्याच्या कारणावरून पदावरून दूर करण्यात आले होते. त्यानंतरही डॉ. तावरे यांनी कल्याणी नगर हिट अँड रन प्रकरणातील आरोपीला वाचवण्यासाठी मदत केली आणि त्याच्या रक्ताचे नमुने बदलले. त्या बदललेल्या सॅम्पल्सवर आधारित अहवाल त्यांनी दिला. या अपघात प्रकरणात डॉ. तावरे आणि डॉ. हाळनोर यांना मोठ्या प्रमाणावर पैसे मिळाल्याची चर्चा जोरात सुरु आहे. या दोघांना कोणी संपर्क साधला? आणि त्यांच्यापर्यंत पैसे कोणी पोहोचवले? याचा आता तपास पुणे पोलिसांकडून सुरू आहे.