“आमचा लाडका मुलगा छान गाडी चालवतो, लहान असूनही तो किती एक्स्पर्ट आहे गाडी चालवण्यात, कोणतीही गाडी द्या तो मस्त पळवतो” असे उदगार सध्याचे निष्काळजी पालक अभिमानाने काढताना दिसतात. पूर्वी महाविद्यालयीन तरुण-तरुणी वयाची अठरा वर्षं पूर्ण झाल्यावर रितसर परवाना काढून वाहन चालवत असत. सध्या अल्पवयीन मुलांच्या हातात वाहने दिली जात असून ते बेफाम चालवत आहेत. हे सबंधित पाल्यासाठी व पालकांसाठीदेखील डोकेदुखी ठरु शकते. कल्याणीनगर पोर्श अपघातानंतर तरी पालकांनी या संदर्भात आवर्जून विचार करण्याची गरज निर्माण झाली आहे.
भारतीय मुलांचे खूप लाड करतात त्यामुळे मुलं हट्टी होतात. अशा लाडामुळे ते मार्गदर्शक तत्त्वे किंवा नियमांचे पालनही करत नाहीत. मुलांच्या सर्व मागण्या अनावश्यक प्रेमाने स्वीकारल्या जातात तेव्हा तरुण वय धोकादायक बनते. पालकही त्यांच्या वाहनांच्या चाव्या त्यांच्या अल्पवयीन मुलांना देतात. अशा कृतींमुळे जीवघेणे रस्ते अपघात होतात. अल्पवयीन वाहनचालक केवळ स्वतःचाच नव्हे तर रस्त्यावरील इतरांचाही जीव धोक्यात घालतात. बहुतेक वेळा पालकच अल्पवयीन मुलांना वाहन चालविण्यास प्रोत्साहन देतात. मुलांना वाहन चालवताना रोमांचक वाटत असले तरी, त्यांचा मेंदू हे ‘थ्रिल’ हाताळण्यासाठी पुरेसा परिपक्व नसतो. ग्रिप, गिअर्स, स्टिअरिंग, क्लच आणि ब्रेक हाताळताना मुलांकडून चुका होऊ शकतात.
आपल्या मुलांची काळजी घेणे हे पालकांचे कर्तव्य आहे. वाहनाचे नुकसान झाल्यास इन्शुरन्स आहे किंवा नवीन वाहन घेता येईल, परंतु एखादा बहुमूल्य जीव गेला तर त्याची पुन्हा भरपाई होणे शक्य नसते. अनेक अल्पवयीन मुलांना वाहन चालविण्याचा अनुभव प्रत्यक्षात कमी असल्याने ते इतर वाहनचालकांना धोका निर्माण करीत असतात. स्वतःच्या चुकीमुळे एखाद्या निरपराधांचा निष्कारण जीव जाईल अशी परिस्थिती निर्माण होऊ नये म्हणून प्रत्येकाने आपल्या मुलांना वाहन देण्यापासून रोखावे. हि प्रत्येक सुज्ञ पालकांची जबाबदारी आहे.
या वेगवान जगात कोणाकडेच वेळ नाही. त्यामुळेच पालक आपल्या 18 वर्षांखालील मुलांना दुचाकी देतात. शाळकरी मुलांसाठी दुचाकी चालवणे हा एक थरार आहे. त्यापैकी बहुतेकांना वेगाने चालवणे आवडते. त्यामुळे कधीकधी त्यांना आपला अनमोल जीव गमवावा लागतो. हे कुटुंबाचे आणि राष्ट्राचेही मोठे नुकसान आहे. पालक, शिक्षक, स्थानिक सरकारी अधिकारी आणि पोलिसांनी हि सामुहिक जबाबदारी उचलली पाहिजे. पालकांनी दक्ष रहावे आणि अल्पवयीन मुलांना दुचाकी किंवा कार देऊ नये. शिक्षकांनी व्याख्याने द्यावीत आणि 18 वर्षापूर्वी वाहन चालवण्याचे दुष्परिणाम विद्यार्थ्यांना सांगावेत.
पोलिसांसमोरही अल्पवयीन वाहने चालवत असून पोलिसांचा धाक उरला नाही. पूर्वी पोलीस त्यांना हटकत असत, त्यामुळे थोडा दबदबा होता. परंतु आता कोणीही हटकत नसल्याने कोणाला धाक उरला नाही. अल्पवयीन वाहनचालकांना रोखण्यासाठी, वाहतूक पोलिसांनी उल्लंघन करणाऱ्यांना कठोर दंड ठोठावून पालकांना जबाबदार धरले पाहिजे. देशातील रस्ते अपघातांचे वाढते प्रमाण रोखण्यासाठी केंद्र सरकारने वाहतूक नियम भंगाच्या दंडाच्या रकमेत वाढ केलेली आहे. त्यामध्ये अल्पवयीन मुला-मुलींकडून वाहन चालविताना गुन्हा घडल्यास वाहन मालक- पालकांना 25 हजार रुपयांचा दंड व तीन वर्षे तुरुंगवास होणार आहे. अल्पवयीन मुलाने वाहन चालवल्यामुळे होणारे अपघात टाळण्यासाठी पालकांनी पोलिस व प्रशासनाला सहकार्य करावे.
अल्पवयीन वाहन चालविण्यास मुले आणि पालक दोघेही जबाबदार आहेत. पालक, शिक्षक आणि पोलिस मिळून ही धोके प्रभावीपणे टाळू शकतात. शालेय अभ्यासक्रमातील पाठ्यपुस्तकांमध्ये रस्ता सुरक्षा धडे शिकवण्याची गरज आहे. रस्ते अपघातांमुळे महाराष्ट्रामध्ये दरवर्षी अंदाजे 15 हजार लोकं जीव गमावतात. जानेवारी ते डिसेंबर 2022 या कालावधी मध्ये झालेल्या अपघातांपैकी अर्ध्यापेक्षा जास्त अपघात हे दुचाकी चालकांचे होते. यामध्ये तब्बल 7700 लोकांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे आपण सर्व मिळून असा समाज घडवूया की जिथे आपली मुलं उंच उडायला शिकतील, कोसळायला नव्हे. मात्र यासाठी आपण सर्वांनी खारीचा वाटा उचलण्याची गरज आहे.
– पत्रकार राजेंद्र (बापूसाहेब) काळभोर, पुणे जिल्हाध्यक्ष, प्रिंट व डिजिटल मीडिया पत्रकार संघ.