मंचर, (पुणे) : रात्रीच्या वेळी मोबाईलवर कोणाशी चॅटिंग करते, याचा जाब पती आणि माहेरच्या नातेवाईकांसमोर विचारला असता 34 वर्षीय विवाहित महिलेने पळत जाऊन बिल्डिंगवरून उडी मारून आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना घडली आहे. अष्टविनायक सोसायटी मंचर, डोबीमळा (ता. आंबेगाव) येथे गुरुवारी (ता. 23) सायंकाळी साडेचार वाजण्याच्या सुमारास हि घटना घडली आहे.
पुनम जिग्नेश शिंदे असे आत्महत्या केलेल्या विवाहित महिलेचे नाव आहे. याप्रकरणी पूनम यांचे भाऊ नरेंद्र निघोट यांनी मंचर पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. त्यानुसार मंचर पोलिसांनी आकस्मित मृत्यूची नोंद करण्यात आली असून या घटनेचा तपास सुरू करण्यात आल्याचे मंचर पोलिसांनी सांगितले.
पोलिसांनी दिलेली माहितीनुसार, नरेंद्र निघोट हे कुटुंबासमवेत अष्टविनायक सोसायटी मंचर डोबीमळा (ता. आंबेगाव) येथे राहत असून त्याच सोसायटीमध्ये दुसऱ्या मजल्यावर त्यांची बहीण पुनम जिग्नेश शिंदे, तिचा पती व मुलासोबत राहण्यास आहे.
गुरुवारी (ता. 23) पहाटे तीन वाजता निघोट यांचे मेहुणे जिग्नेश शिंदे हे पत्नी पूनम व मुलगा मयंक यांना सोबत घेऊन त्यांच्या घरी आले व त्यांनी तुझी बहीण ही दुसऱ्या मुलासोबत मोबाईलवर रात्री उशिरापर्यंत चॅटिंग करत असते, असे सांगितले.
त्यावेळी नरेंद्र निघोट यांनी त्यांना घरात घेत आपण काय आहे ते सकाळी पाहू, असे सांगितले. त्यानंतर सकाळी त्यांनी त्यांचे नातेवाईक यांना मंचर येथे बोलावून घेतले व जिग्नेश व बहीण पूनम यांच्याशी चर्चा केली. पुनम ज्याच्या सोबत मोबाईलवर चॅटिंग करत होती. तो मुलगा खडकी पिंपळगाव येथील असल्याने त्याला फोन केला असता तो सायंकाळी पाच वाजता तुमच्याकडे येतो, असे त्याने सांगितले.
दरम्यान, त्या मुलाला फोन केला असता त्याचा फोन बंद लागला. त्याच वेळी सर्वजण घरात असताना पूनम जिग्नेश शिंदे राहत असलेल्या बिल्डिंगच्या टेरेसवर पळत जाऊन तिने टेरेसवरून खाली उडी मारली. पूनमला तात्काळ उपचारासाठी उपजिल्हा रुग्णालय मंचर येथे दाखल केले असता डॉक्टरांनी ती मयत झाली असल्याचे घोषित केले.