राजगुरुनगर, (खेड) : खेड तालुक्यातील शिरोली गावच्या हद्दीत एका अल्पवयीन मुलीवर ओढणीने तोंड बांधून बलात्कार केल्याची खळबळजनक घटना घडली आहे. ही घटना मंगळवारी (दि. २१) सायंकाळी साडेचारच्या सुमारास शिरोली गावच्या हद्दीत जाखमाता मंदिराजवळ घडली. याप्रकरणी खेड पोलिसांनी संशयित आरोपीवर गुन्हा दाखल करून एका तसाच्या आताच बेड्या ठोकल्या आहेत. राम ऊर्फ रामेश्वर संजय राठोड (सध्या स. वाघमारे वस्ती चांडोली, ता. खेड, मूळ रा. सोलापूर जिल्हा) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संशयित राम राठोड याने पीडित अल्पवयीन मुलीला जबरदस्तीने दुचाकीवर बसवून शिरोली गावच्या हद्दीत जाखमाता मंदिराजवळील झाडीत नेले. तेथे पीडित मुलीचे तोंड ओढणीने बांधून बलात्कार केला. अल्पवयीन मुलगी घरी आल्यावर झालेला प्रकार तिने आजीला सांगितला. आजीने याबाबत खेड पोलिस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली.
खेड पोलिसांनी आरोपी राठोडच्या शोधासाठी दोन पथके तयार करून अवघ्या तासाभरातच पोलिसांनी त्याला बेड्या ठोकल्या. बुधवारी (दि. २२) त्याला न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने दि.२४ मे पर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. पुढील तपास खेड पोलीस करत आहेत.