पुणे : शहरात कमाल तापमानात घट झाली असून, गुरुवारी (दि.२३) कमाल तापमानाचा पारा ३७.९ अंश सेल्सिअस इतका होता. वडगावशेरी येथे किमान तापमान २८.४ अंश सेल्सिअस होते. दरम्यान, शहरात पुढील तीन दिवस आकाश मुख्यतः निरभ्र राहणार आहे. दुपारनंतर अंशतः ढगाळ राहील. मुसळधार पावसानंतर सध्या वातावरण कोरडे झाल्यामुळे कमाल तापमान वाढले होते. पारा ४० अंशांच्या वर गेला होता. मात्र, गुरुवारी ढगाळ हवामान असल्यामुळे पारा उतरला आहे. त्यामुळे काहीसा दिलासा मिळाला आहे. मात्र, रात्रीच्या उकाड्यात उच्चांकी वाढ झाली आहे.
वाढत्या उकाड्यामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. किमान तापमानातही चढ-उतार होत आहे. शिवाजीनगरचे किमान तापमान २५.७ अंश सेल्सिअस होते. हवेतील आर्द्रता वाढल्यामुळे तापमानात बदल होत आहे. येत्या २४ ते २७ मे रोजी आकाश मुख्यतः निरभ्र राहणार आहे. दुपारनंतर अंशतः ढगाळ राहील. तसेच, २८ ते २९ मेदरम्यान आकाश ढगाळ राहून दुपारनंतर मेघगर्जना व विजांच्या कडकडाटासह पाऊस पडण्याची शक्यता आहे. या दरम्यान कमाल तापमानाचा पारा ३९ ते ४१ अंश सेल्सिअसदरम्यान राहणार असल्याचे हवामान विभागाने कळविले आहे.