डोंबिवली: डोंबिवली एमआयडीसीतील अमुदान नावाच्या रासायनिक कंपनीत आज दुपारच्या सुमारास मोठा स्फोट झाला. या स्फोटाची माहिती मिळताच कल्याण लोकसभेचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी घटनास्थळी धाव घेत पाहणी केली. या स्फोटात सुमारे ३० जण जखमी झाले असून या सर्वांवर खासगी आणि सरकारी रुग्णालयांमध्ये उपचार सुरू आहेत. या जखमींची भेट घेऊन विचारपूस करत त्यांच्या कुटुंबियांना खासदार श्रीकांत शिंदे यांनी धीर दिला. यावेळी उद्योगमंत्री उदय सामंत, मनसेचे आमदार राजू पाटील, आमदार निरंजन डावखरे, शिवसेना सचिव भाऊसाहेब चौधरी, ठाण्याचे जिल्हाधिकारी अशोक शिनगारे, डोंबिवली शहरप्रमुख राजेश मोरे यांच्यासह स्थानिक रहिवासी उपस्थित होते.