हैदराबाद : एका कारच्या मालकाने आकर्षक वाहन क्रमांकासाठी तब्बल २५.५ लाख रुपये मोजले आहेत. ‘९९९९’ या वाहन क्रमांकासाठी कारच्या मालकाने लाखो रुपयांची बोली लावल्याची माहिती मंगळवारी तेलंगणा राज्य वाहतूक प्राधिकरणच्या अधिकाऱ्याने दिली. ‘९९९९’ या वाहन क्रमांकासाठी ११ जणांनी मागणी केल्यामुळे सोमवारी ऑनलाइन लिलावाचे आयोजन केले होते. या लिलावात एका व्यक्तीने आपल्या उच्च श्रेणीच्या वाहनाला ‘टीजी-०९ ९९९९’ हा क्रमांक मिळवण्यासाठी २५,५०,००२ रुपये मोजले.
तेलंगणा, राज्यात प्रथमच एखाद्या वाहन क्रमांकाला लिलावात एवढी मोठी रक्कम मिळाल्याचा दावा हैदराबादचे सहपरिवहन आयुक्त सी. रमेश यांनी केला. गतवर्षी ऑगस्ट महिन्याच्या सुरुवातीला झालेल्या लिलावात ‘९९९९’ या वाहन क्रमांकाला २१.६ लाख रुपये मिळाले होते. उल्लेखनीय बाब म्हणजे गत मार्चमध्ये तेलंगणा राज्यात काँग्रेसचे सरकार स्थापन झाल्यानंतर वाहन नोंदणी कोडमध्ये बदल करून तो ‘टीसी’ ऐवजी ‘टीजी’ करण्यात आला.