अहमदनगर : बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये ईव्हीएम मशीन ठेवलेल्या स्ट्राँग रूममधील सीसीटीव्ही (CCTV) काही काळासाठी बंद झाल्याचा प्रकार राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या नेत्यांनी समोर आणला होता. अशातच आता अहमदनगरमध्ये देखील ईव्हीएम ठेवलेल्या स्ट्राँग रूम परिसरात एक अनोळखी व्यक्ती घुसखोरीचा प्रयत्न झाल्याचा आरोप केला आहे. एक्स या सोशल मिडिया माध्यमावर महाविकास आघाडीचे उमेदवार निलेश लंके यांनी एक पोस्ट केली आहे. त्यांच्या या पोस्टने राजकीय वर्तुळात प्रचंड खळबळ उडाली आहे.
अहमदनगर लोकसभा मतदारसंघाचे ईव्हीएम मशीन ठेवलेल्या स्ट्रॉंग रूम परिसरात एक अनोळखी व्यक्ती आढळून आला आहे. हा व्यक्ती सीसीटीव्ही यंत्रणेत छेडछाड करण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप निलेश लंके यांच्या समर्थकांनी केला आहे. ईव्हीएम मशीन ठेवलेल्या गोदामाबाहेर लंके यांचे कार्यकर्ते सध्या लक्ष ठेऊन आहेत.
त्यांना हा प्रकार निदर्शनास येताच त्यांनी संबंधित व्यक्तीला विचारपूस केली असता, त्याने आपण तांत्रिक विभागातील असल्याचे सांगितले. मात्र, गोदामाच्या बाहेरील केंद्रीय सुरक्षा विभाग, राज्य सुरक्षा विभाग आणि स्थानिक पोलिसांची तिहेरी सुरक्षा असताना सुद्धा एक व्यक्ती सुरक्षा यंत्रणेकडे कोणतीही नोंद न करता थेट गोदामाच्या शटर जवळ जातेच कशी? असा सवाल लंके यांच्या कार्यकर्त्यांनी केला आहे.
सदर व्यक्ती रात्री ८ वाजून २० मिनिटांनी ईव्हीएम ठेवलेल्या परिसरात आला. त्याचे सीसीटीव्ही फुटेज आहे. यामुळे ईव्हीएम ठेवलेल्या गोदामच्या सुरक्षेबाबत लंके समर्थकांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. दरम्यान, याबाबत प्रशासनाने अद्याप कोणतीही माहिती दिलेली नाही. मविआ उमेदवार निलेश लंके यांनी स्वतः हा व्हिडीओ एक्सवर पोस्ट केला आहे.
निलेश लंके यांनी शेअर केला व्हिडिओ
निलेश लंके म्हणाले की, संरक्षणव्यवस्था थोडे उठा माणूस गोदामापर्यंत आलाय. काल रात्री आमच्या नगर दक्षिण अहिल्यानगर मतदारसंघाच्या ईव्हीएम ठेवलेल्या ठिकाणी त्रिस्तरीय सुरक्षा भेदून एका इसमाने प्रवेश करत चक्क शटरपर्यंत जात सीसीटीव्ही मध्ये बिघाड करण्याचा प्रयत्न केला माझ्या सहकार्याने तो लगेच हाणून पाडला. माझे सहकारी हा इसम पकडू शकतात मग कोणतीही पूर्व सूचना न देताना गेलेल्या त्या व्यक्तीला त्रिस्तरीय सुरक्षा का रोखू शकली नाही? कुंपणच आता शेत खातय. लोकशाही चोरी करण्याचा प्रयत्न केला जातोय पण प्रशासन मात्र उघड्या डोळ्यांनी पाहतय, असे त्यांनी म्हटले आहे.