पुणे : दोन दिवसापासून राज्यात गारठा वाढू लागला आहे. गुलाबी थंडीची चाहूल लागली आहे. कमाल तापमानात चढ-उतार सुरूच आहे. दुपारी उन्हाचा चटका टिकून आहे. सोमवारी (ता. ३१) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये निफाड येथील गहू संशोधन केंद्रात राज्यातील नीचांकी १२.० अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. मंगळवारी (ता. १) राज्यात हवामान कोरडे राहण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.
नैऋत्य बंगालच्या उपसागरात उत्तर श्रीलंकेच्या किनाऱ्यालगत समुद्र सपाटीपासून ३.१ किलोमीटर उंचीवर चक्राकार वाऱ्यांची स्थिती कायम आहे. तर या प्रणालीपासून केरळ, तमिळनाडू ते आग्नेय अरबी समुद्रापर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा तयार झाला आहे. दक्षिण भारतातील राज्यात पावसाचा जोर वाढणार असला तरी महाराष्ट्रात मात्र निरभ्र आकाश आहे.
उत्तरेकडून येणाऱ्या थंड व कोरड्या वाऱ्यांमुळे राज्यात गारठा वाढू लागला आहे. रविवारी (ता. ३०) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये कोकणात किमान तापमान २० अंशांच्या आसपास होते. तर उर्वरित राज्यात अनेक ठिकाणी किमान तापमान १६ अंशांच्या खाली घसरले होते. तर कमाल तापमान २९ ते ३५ अंशांच्या दरम्यान आहे.
सोमवारी (ता. ३१) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये राज्यात विविध ठिकाणी नोंदले गेलेले कमाल तापमान, कंसात किमान तापमान (अंश सेल्सिअसमध्ये) :
पुणे ३०.६ (१३.४), जळगाव ३४(१४.५), कोल्हापूर ३१.२ (१७.४), महाबळेश्वर २६.६(१३.४), नाशिक ३०.७ (१३.६), निफाड ३०.१ (१२), सांगली ३२.१(१५.८), सातारा ३०.४(१४.२), सोलापूर ३२.७ (१७), सांताक्रूझ ३५.४(२०.५), डहाणू ३४.३ (२०.५), रत्नागिरी ३५ (१९.४), औरंगाबाद ३०.६ (१३.३), नांदेड ३१.६ (१७), उस्मानाबाद – (१४), परभणी ३१.६ (१५.९), अकोला ३३.२ (१७.७), अमरावती ३२.० (१५.५), बुलडाणा ३०.६ (१६.४), ब्रह्मपुरी ३१.८ (१६.३), चंद्रपूर ३१.४ (१७.२), गडचिरोली ३१.४(१६), गोंदिया ३०(१५.६), नागपूर ३०.८ (१५.६), वर्धा ३१(१६.४), वाशीम – (१६.८), यवतमाळ ३२.५ (१४.५).