पुणे : लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यात आज (सोमवारी, दि. १३) मतदान होणार आहे. मात्र, मतदानाला पूर्वमोसमी पावसाचा फटका बसण्याची शक्यता आहे. सोमवारी राज्यात ठिकठिकाणी मेघगर्जना, विजांचा कडकडाट, गारपीट आणि वादळी वाऱ्यासह पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. मराठवाड्यापासून कर्नाटक, केरळ ते कोमोरिन भागापर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा सक्रिय आहे. मध्य महाराष्ट्रावर वाऱ्याची चक्रीय स्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे अरबी समुद्रावरून बाष्पयुक्त वारे राज्याकडे येत आहे. उत्तरेकडून येणारे उष्ण वारे आणि स्थानिक तापमान वाढीमुळे जास्त उंचीचे ढग निर्माण होत आहेत. या कारणामुळे राज्यात पूर्वमोसमी पावसाला सुरुवात झाली आहे.
आज अहमदनगर, पुणे, सातारा, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सोलापूर, धाराशीव, लातूर, नांदेड, बुलढाणा, अकोला, चंद्रपूर, गोंदिया, गडचिरोली येथे पावसाचा यलो अलर्ट आहे. येथे ठिकठिकाणी मेघगर्जना, विजांचा कंडकडाटासह पावसाचा इशारा आहे. तसेच कोल्हापूर, सांगली, यवतमाळ, अमरावती, वाशिम, वर्धा, नागपूर येथे ऑरेंज अलर्ट आहे. येथे मेघगर्जना, विजांचा कडकडाट, गारपीट आणि वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. तसेच उर्वरित भागात हवामान कोरडे राहणार आहे. १४ ते १६ मे दरम्यान राज्यभरात पावसाचा इशारा दिला आहे. रविवारी सायंकाळपर्यंत पुणे येथे ०.१ मि.मी., लोहगाव २, महाबळेश्वर १, नांदेड ४, अमरावती ६, तर वर्धा येथे १६ मि.मी., पाऊस पडला आहे. तसेच इतर भागातही पाऊस पडला आहे.
पाऊस व ढगाळ हवामानामुळे राज्यातील विविध भागातील तापमान उतरले आहे. कमाल व किमान तापमानात घट पाहायला मिळत आहे. पाऊस व ढगाळ हवामानामुळे उन्हाचा चटका कमी होऊन अनेक शहरांचे तापमान ४० अंशाच्या खाली आहे. रविवारी राज्यात सर्वात जास्त कमाल तापमान अमरावती येथे ४१.८ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. तर सर्वात कमी किमान तापमान महाबळेश्वर येथे १६.७ अंश सेल्सिअस इतके होते.
पावसामुळे मतदानाचा टक्का घटण्याची शक्यता
लोकसभा निवडणुकीत मतदानाचा टक्का वाढवण्यासाठी निवडणूक आयोग, विविध संस्था उपक्रम राबवत आहे. पण, उन्हाच्या झळांमुळे मतदार घराबाहेर पडण्यास टाळाटाळ करत आहे. त्यातचं आता सोमवारी होणाऱ्या चौथ्या टप्प्यातील मतदानावर अवकाळीचे सावट असल्यामुळे मतदान टक्का घटण्याची शक्यता व्यक्त होत आहे.