लोणीकंद : लाईनमध्ये सीएनजी भरा अथवा दुसरीकडे जाऊन भरा असे म्हणल्याच्या कारणावरून चौघांनी पंपचालक व त्याच्या एका नातेवाईकाला लोखंडी वस्तूने व लाकडी दांडक्याने मारहाण केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. पुणे नगर महामार्गावरील खांदवे नगर येथील सीएनजी पंपावर सोमवारी (ता. ११) दुपारी १ वाजण्याच्या सुमारास हि घटना घडली आहे.
याप्रकरणी राजू भरत वारघडे (वय-४०, रा. ठुबे नगर, खराडी, ता. हवेली) यांनी लोणीकंद पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार लोणीकंद पोलिसांनी संभाजी भाऊसाहेब सानप (रा. सोमेश्वर नगर, लोणीकंद) महेश कंद (रा. बारावा मैल, लोणीकंद), सुंदर कांबळे (रा. खांदवेनगर, वाघोली) सागर पुर्ण नाव माहित नाही (रा. केडगाव अ.नगर) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, राजू भरत वारघडे यांचा पुणे नगर महामार्गावरील खांदवे नगर परिसरात सीएनजी पंप आहे. सोमवारी दुपारी एक वाजण्याच्या सुमारास पंपावर मोठ्या प्रमाणात गर्दी झाल्याने वारघडे हे गर्दीवर नियंत्रण मिळवण्यासाठी आलेल्या वाहनांना लाईन मध्ये येण्यासाठी सांगत होते.
यावेळी एक मारुती इको गाडी अचानक लाईनच्या विरुद्ध बाजुने पंपावर आली तेव्हा वारघडे यांनी गाडी चालक यांना तु तुझी गाडी लाईन मध्ये या तुम्हांला सी.एन.जी तुम्हाला मिळेल असे सांगितले. यावेळी मी खांदवेनगरचा राहणारा आहे तु ओळखत नाही का? असे म्हणुन राजू वारघडे यांच्याशी हुज्जत घातली व तु थांब १० मिनिट थांब तुला दाखवतो असे म्हणुन धमकी देत गाडी घेऊन निघून गेला.
काही वेळाने मारुती इको गाडी पंपावर आली व त्यामागुन बुलेट वरुन आणखी दोन इसम असे चारजण आले. यातील एकाने राजू वारघडे यांना शिवीगाळ करीत लोखंडी वस्तुने तोंडावर मारहाण करण्यास सुरुवात केली. तर इतर तिघांनी लाकडी दाडक्याने मारहाण करुन गंभीर जखमी केले.
दरम्यान, यावेळी मेव्हणा ऋषिकेश मनोहर पठारे हा वाचवण्यासाठी मध्ये आला असता त्यालाही त्यांनी लाकडी दांडक्याने मारहाण करुन जखमी केले. या घटनेची माहिती पोलीसांना फोन करुन दिली असता तात्काळ लोणीकंद पोलीसांनी त्यातील एकाला पकडले व बाकी तीन जण पळून गेले.
याबाबत लोणीकंद पोलीस ठाण्यात चार आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला असून याबाबत पुढील तपास लोणीकंद पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गजानन पवार यांच्या मार्गदर्शनाखाली लोणीकंद पोलीस करत आहेत.