पुणे : लोकसभा निवडणुकीच्या (Lok Sabha elections) चौथ्या टप्प्यातील मतदान प्रक्रियेमध्ये पुणे लोकसभा मतदारसंघांचा समावेश आहे. या निवडणुकीचे मतदान येत्या १३ तारखेला होणार आहे. पुणे लोकसभा निवडणुकीचे महायुतीचे उमेदवार मुरलीधर मोहोळ (Muralidhar Mohol) यांच्या प्रचारार्थ महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांची सारसबाग येथे सभा होणार आहे.
या सभेनिमित्त आज शुक्रवारी (१० मे) दुपारी चारनंतर सारसबाग (Sarasbagh) परिसरात वाहतूक वळवण्यात आली आहे. सिंहगड रस्त्यावरुन बाजीराव रस्त्याकडे जाणाऱ्या वाहनचालकांनी पर्यायी मार्गाचा वापर करावा, असे आवाहन वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त रोहिदास पवार यांनी केले आहे.
जाणून घ्या आजची वाहतूक व्यवस्था
* सारसबाग येथील स्वातंत्र्यवीर सावरकर पुतळा परिसरातून स्वारगेटकडे जाणाऱ्या वाहनचालकांनी मित्रमंडळ चौक, लक्ष्मीनारायण चित्रपटगृहमार्गे इच्छितस्थळी जावे.
* बाजीराव रस्त्याकडे जाणाऱ्या वाहनचालकांनी मित्रमंडळ चौक, सावरकर पुतळा चौक, सिंहगड रस्ता, दांडेकर पूल चौकमार्गे इच्छितस्थळी जावे.
* स्वारगेट येथील देशभक्त केशवराव जेधे चौकातून बाजीराव रस्त्याकडे जाणाऱ्या वाहनचालकांनी लक्ष्मीनारायण चित्रपटगृह, मित्रमंडळ चौक, स्वातंत्र्यवीर सावरकर पुतळा चौक, दांडेकर पूलमार्गे इच्छितस्थळी जावे.
* सातारा रस्ता, शंकरशेठ रस्त्याने बाजीराव रस्त्याकडे येणाऱ्या वाहनचालकांनी लक्ष्मीनारायण चित्रपटगृह चौक, मित्रमंडळ चौक, दांडेकर पूलमार्गे इच्छितस्थळी जावे.