लोणी काळभोर : भुरट्या चोरांनी चक्क लोणी काळभोर (ता. हवेली) येथील पोस्ट ऑफिस फोडण्याचा प्रयत्न केल्याचा प्रकार समोर आला आहे. मात्र त्यांना लॉकर उघडता न आल्याने त्यांचा चोरीचा प्रयत्न फसला आहे. त्यामुळे खूप मोठी रक्कम चोरी जाण्यापासून वाचली आहे. तर चोरी करण्यासाठी आलेले चोरटे सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाले आहे.
याप्रकरणी अवंती हर्षवर्धन उगले (वय-३७, रा. मांजरी, ता. हवेली) यांनी बुधवारी (ता.८) लोणी काळभोर पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यानुसार अज्ञात चोरट्यांच्या विरोधात लोणी काळभोर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अवंती उगले या लोणी काळभोर पोस्ट ऑफिसमध्ये पोस्ट मास्तर म्हणून काम करीत आहेत. उगले यांनी नेहमीप्रमाणे शनिवारी (ता.२७ एप्रिल) सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास पोस्ट ऑफिस बंद केले. त्यानंतर फिर्यादी उगले व त्यांचे सहकारी घरी निघून गेले.
दरम्यान, अज्ञात चोरट्यांनी शनिवारी सायंकाळी साडे सात वाजण्याच्या सुमारास पोस्ट ऑफिसकडे गेले. चोरट्यांनी कशाच्यातरी सहाय्याने दरवाजाची कडी कोयंडा तोडून पोस्ट ऑफिसमध्ये प्रवेश केला. अज्ञात चोरट्यांनी तब्बल २ तास लॉकर तोडण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांना लॉकर उघडता न आल्याने त्यांचा चोरीचा प्रयत्न फसला. आणि चोरटे रात्री साडे नऊ वाजण्याच्या सुमारास पळून गेले. मात्र चोरटे सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाले आहेत.
याप्रकरणी अवंती उगले यांनी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञात चोरट्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शशिकांत चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार श्रीनाथ जाधव करीत आहेत.