कोलोंबो : देशातील काही भागांमध्ये अदानी ग्रुपच्या अदानी ग्रीन एनर्जी कंपनीकडून वीज पुरवठा केला जात आहे. असे असताना आता भारताबाहेरही कंपनी वीज निर्मितीसाठी मदत करणार आहे. अदानी ग्रीन एनर्जी कंपनीकडून पुढील 20 वर्षे वीज खरेदी करण्याला श्रीलंकेच्या सरकारने मान्यता दिली आहे.
अदानी ग्रुपचा विस्तार मोठ्या प्रमाणात होत आहे. ईशान्य श्रीलंकेतील मन्नार आणि पूनीरिनमध्ये ४८४ मेगावॅट क्षमतेच्या पवन ऊर्जा केंद्रांच्या विकासाला मार्च २०२२ मध्ये कॅबिनेटची मंजुरी मिळाली आहे. या करारानुसार अदानी ग्रीन एनर्जी देशाच्या ईशान्य भागामध्ये ४८४ मेगावॅट उर्जा निर्मितीसाठी पवन उर्जा स्थानक उभारणार आहे.
दरम्यान, अदानी ग्रुपच्या सहकार्याने निर्मिती होत असलेल्या या पवन ऊर्जेसाठी ताशी प्रति किलोवॅट ०.०८२६ डॉलर इतका दर निश्चित करण्यात आला आहे. ही रक्कम स्थानिक रुपयांच्या हिशोबात दिली जाणार आहे, असे श्रीलंकेच्या ऊर्जामंत्री कांचना विजयसेकरा यांनी सांगितले.