लोणी काळभोर: शालेय अभ्यासक्रमाबरोबरच विविध स्पर्धांमध्ये जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थी मोठ्या संख्येने चमकले आहेत. शिक्षकांच्या अथक प्रयत्नामुळे काही झेडपी शाळांच्या गुणवत्तेचा टक्का वाढला आहे. त्यामुळे प्राविण्य मिळविलेल्या झेडपी शाळेत आपल्या पाल्याचा प्रवेश निश्चित करण्यासाठी पालक ऑनलाईन (आरटीई) प्रवेश प्रक्रियेचासुद्धा अवलंब करीत आहे. यामध्ये लोणी काळभोर, थेऊर-तारमळा येथील पुणे जिल्हा परिषदेच्या सेमी इंग्लिश माध्यमाच्या शाळेत विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यासाठी चक्क प्रतिक्षा यादी (वेटिंग लिस्ट) तयार करण्यात आली आहे. जिल्हा परिषदेच्या शाळेत विद्यार्थी जास्त व जागा कमी अशी परिस्थिती पहिल्यांदाच हवेली तालुक्यात झाली आहे.
पुणे जिल्ह्यातील ३४ शाळांमध्ये अशी प्रतिक्षा यादी तयार करण्यात आली आहे. हवेली तालुक्यातील लोणी काळभोर जिल्हा परिषद शाळा क्र. १, शाळा क्र. २ व थेऊर येथील तारमळा जिल्हा परिषद शाळेचा यामध्ये समावेश आहे. शिरूर, हवेली, आंबेगाव, इंदापूर, जुन्नर, खेड, मुळशी व पुरंदर या तालुक्यातील शाळांमध्ये प्रतिक्षा यादी तयार करण्यात आली आहे. मुळशी तालुक्यातील सर्वाधिक १२ शाळांचा समावेश आहे. त्यापाठोपाठ आंबेगाव तालुक्यातील सात शाळांचा समावेश आहे. तर बारामती, भोर, दौंड आणि मावळ या चार तालुक्यांतील एकाही शाळेत प्रतिक्षा यादी बनवण्यात आली नाही.
सरकारी शाळांचा दर्जा खालावल्याचे कारण सांगत अनेक पालक कायम नाक मुरडताना दिसतात. तर दुसरीकडे व्यावसायिक बनलेल्या खासगी शाळांसाठी भरमसाठ पैसा खर्च करत असतात. मात्र, सरकारी शाळेत प्रवेश घेण्यासाठी विद्यार्थी प्रतीक्षा यादी असेल तर जिल्हा परिषद शाळेतील शिक्षणाची गुणवत्ता पुन्हा एकदा सुधारली आहे, असं म्हणावे लागेल. `
झेडपीच्या शाळांचे सर्वत्र कौतुक
आतापर्यंत सरकारी शाळा म्हटलं की, केव्हाही जा हमखास प्रवेश मिळणार, अशी परिस्थिती असायची. परंतु, याला आता पुणे जिल्हा परिषदेच्या शाळा अपवाद ठरू लागल्या आहेत. त्यामुळे विद्येच्या माहेरघरातील लोणी काळभोर, थेऊर येथील जिल्हा परिषदेच्या शाळेसह जिल्ह्यातील ३४ शाळांचे नागरिकांकडून भरभरून कौतुक होत आहे.
सर्वत्र सेमी इंग्रजी माध्यमाचा अभ्यासक्रम सुरु करावा
पुणे जिल्ह्यातील या ३४ शाळांमध्ये सेमी इंग्रजी माध्यमाचा अभ्यासक्रम आहे. त्यामुळे पालक इंग्रजी माध्यमाच्या ऐवजी सेमी इंग्रजी माध्यमाला प्राधान्य देतात. त्यामुळे या शाळांकडे पालकांचा मोठ्या प्रमाणात कल असतो. या सेमी इंग्रजी माध्यमाचा शाळांमध्ये सध्या विद्यार्थी प्रतीक्षेच्या यादीत आहेत. त्यामुळे सर्व शाळांमध्ये सेमी इंग्रजी माध्यमाचा अभ्यासक्रम सुरु करावा, अशी पालकांनी मागणी केली आहे. त्यामुळे विद्यार्थ्याला शाळेत त्वरित प्रवेश मिळेल.
शाळांची पटसंख्या वाढण्याची शक्यता?
पुणे जिल्हा परिषदेच्या सर्व शाळांमध्ये सेमी इंगजी माध्यमाचा अभ्यासक्रम सुरु करण्यात आला, तर इंग्रजी माध्यमांच्या शाळेमध्ये प्रवेश घेतलेले विद्यार्थी आपोआपच मराठी शाळेत प्रवेश घेतील. त्यामुळे झेडपी शाळांची पटसंख्या मोठ्या संख्येने वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही.
तालुकानिहाय शाळा
१)मुळशी : नांदे, पिरंगुट, हिंजवडी, भूगाव नंबर१, भूगाव नंबर २, सूस, माण, लवळे, भोईरवाडी, पौड, सुतारवाडी, शिंदेवाडी.
२)आंबेगाव : पिंपळगाव तर्फे म्हाळुंगे, साकोरेमळा, थोरांदळे, शिंगवे, मोरडेवाडी, अवसरी खुर्द, लोंढेमळा.
३)हवेली : लोणी काळभोर, तारमळा, घुले वस्ती, लोणीकंद.
४)शिरूर : वाबळेवाडी, कोयाळी पुनर्वसन, पिंपळे खालसा आणि शिक्रापूर.
५) खेड : धानोरे, टाकळकरवाडी, सतारकावस्ती, ठिगळस्थळ.
६)इंदापूर : मंडलिक वस्ती.
७)जुन्नर : वडगाव आनंद.
८) पुरंदर : कदमवस्ती.
शाळेसारखे दुसरे मंदिर नाही आणि विद्यार्थ्यांसारखा दुसरा देव नाही. या वाक्याप्रमाणे शाळेत विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी नेहमीच प्रयत्न केले जातात. त्यामुळे या शाळेत आपल्या पाल्याला प्रवेश मिळावा, यासाठी पालकांची नेहमी धडपड असते. इंग्रजी माध्यमांच्या शाळेतील फी भरण्यासाठी पालकांना खूप कसरत करावी लागते. त्यामुळे पालकांचा कल आता मराठी शाळांकडे वळला आहे.
मीना नेवसे (मुख्याध्यापिका -लोणी काळभोर जिल्हा परिषद शाळा क्र. १ )