पुणे : ईव्हीएम हॅक करतो म्हणत विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्याकडे अडीच कोटी रुपयांची मागणी केल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी पुण्यातून एका आरोपीला अटक करण्यात आली आहे. आरोपीला एक लाख रुपये घेताना रंगेहाथ पकडण्यात आले. विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्या भावाने सापळा रचत हा प्रकार सर्वांसमोर आणला आहे. मारुती ढाकणे असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. पुणे पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने सदरची कारवाई केली आहे.
ताब्यात घेण्यात आलेला मारुती ढाकणे हा मूळचा अहमदनगर जिल्ह्यातील राहिवासी असल्याची माहिती आहे. छत्रपती संभाजीनगर लोकसभा मतदारसंघात जेवढे ईव्हीएम आहेत, ते सर्व हॅक करुन तुम्हाला पाहिजे तसा निकाल देतो, असे अंबादास दानवेंना फोन करून सांगितले. यासाठी अडीच कोटी रुपयांची मागणी दानवे यांच्याकडे करण्यात आली. या संदर्भात अंबादास दानवेंना संशय आल्याने त्यांनी पोलिसांकडे तक्रार केली. त्यानंतर पोलीसांनी सापळा रचत अंबादास दानवे यांच्याकडे आरोपीला देण्यासाठी पैसे दिले. पुणे शहरातील एका हॉटेलमध्ये आर्थिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी मारुती ढाकणेला पैसे घेताना रंगेहाथ पकडत ताब्यात घेतले आहे.