नाशिक: नाशिकमधील दिंडोरी लोकसभा मतदारसंघात भारतीय जनता पक्षाकडून डॉ. भारती पवार यांना उमेदवारी देण्यात आली आहे. तर राष्ट्रवादी काँग्रेस- शरदचंद्र पवार पक्षाकडून भास्कर भगरे यांना निवडणुकीच्या मैदानात उतरवण्यात आले आहे. परंतु, महाविकास आघाडीने माकपला दिंडोरीची जागा सोडावी, अन्यथा पवार गटाच्या उमेदवाराला पडणारच, असे आव्हान देत माजी आमदार जे.पी. गावित यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला होता. यामुळे महाविकास आघाडीची चांगलीच डोकेदुखी वाढली होती. आता मात्र माजी आमदार गावित यांनी आपला अर्ज दिंडोरी लोकसभेतून माघारी घेतला आहे. तसेच त्यांनी महाविकास आघाडीचे उमेदवार भास्कर भगरे यांना पाठींबा जाहीर केला आहे.
अर्ज मागे घेतल्यानंतर गावित यांनी माध्यमांशी संवाद साधत आपली भूमिका स्पष्ट केली. ते म्हणाले की, मी माकपतर्फे दिंडोरी लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरला होता. परंतु, दिंडोरीची जागा महाविकास आघाडीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला मिळाली आहे. महाविकास आघाडीचा एकच उमेदवार पाहिजे, अशी विनंती शरद पवार यांच्या राष्ट्रवादीकडून करण्यात आली होती.
तसेच माकप पक्षाने देखील सुचना केल्याने मी उमेदवारी अर्ज मागे घेतला आहे. खरं तर माझ्या उमेदवारीमुळे राष्ट्रवादी शरद पवार गटालाच जास्त फायदा झाला असता, मात्र आता भाजप आणि राष्ट्रवादी अशी सरळ लढत दिंडोरीत होईल. त्यामुळे या दोघांमधील लढतीचा परिणाम काय असेल, याबाबत सांगता येणार नाही. तसेच माकप राष्ट्रवादी काँग्रेस- शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार भास्कर भगरे यांना पाठींबा देत आहोत, अशी घोषणा देखील माजी आमदार गावित यांनी केली आहे.