लोणी काळभोर : लोकसभा निवडणुकीच्या (Lok Sabha Elections) पार्श्वभूमीवर थेऊर फाटा (कुंजीरवाडी, ता. हवेली) येथे पुणे शहर पोलिसांनी छावणी उभारली आहे. त्या छावणीतील पोलिसांना नाकाबंदी करून वाहनांची तपासणी करणे अपेक्षित असताना, मात्र त्याऐवजी वाहतूक कोंडी सोडविण्याची वेळ आली आहे. वाहतूक पोलीस नेमणुकीच्या ठिकाणी थांबत नसल्याने पुणे सोलापूर महामार्गावरील (Pune Solapur Highway) वाहतुकीचे तीन तेरा नऊ बारा वाजले आहेत.
पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील पंधरा नंबर ते उरुळी कांचन या २० किलोमीटर अंतराच्या टप्प्यात वाहतूक कोंडी व छोटे-मोठे अपघात हे नेहमीच होत आहे. वाहतूक शाखेच्या पोलिसांच्या नेमणुका १५ नंबर चौक, कवडीपाट टोलनाका, लोणी स्टेशन, थेऊर फाटा, कुंजीरवाडी, उरुळी कांचन या ग्रामपंचायत हद्दीतून जाणाऱ्या महामार्गावर करण्यात आले आहे. वाहतूक पोलीस सकाळी हजेरी लावून जातात, ते नंतर थेट संध्याकाळच्या सुमारास नियुक्तीच्या ठिकाणी दिसत असल्याचे अनेक प्रकार समोर आले आहेत.
पुणे-सोलापूर महामार्गावरील हडपसर १५ नंबर, लोणी स्टेशन चौक, एमआयटी कॉर्नर, थेऊर फाटा, उरुळी कांचन येथील वाहतूक कोंडी सातत्याने होत असल्याने वाहनांच्या रांगा अगदी दोन, तीन किलोमीटरवर लागत आहे. सततची वाहतूक कोंडी कामगार, शेतकरी, नागरिक, प्रवासी, विद्यार्थी, उद्योजक यांची डोकेदुखी ठरत आहे. निवडणुका येतात आणि जातात, पण वाहतूक कोंडीला जबाबदार कोण? वाहतूक कोंडी का सुटत नाही, निवडणुकांचे करायचे काय? असा सवाल पूर्व हवेलीतील नागरिकांनी केला आहे.
दरम्यान, उरुळी कांचन वाहतूक कोंडीचा गंभीर प्रश्न सोडविण्यासाठी पुणे (जिल्हा) पोलीस अधीक्षक पंकज देशमुख हे भेट देऊन ठोस उपाययोजना करण्यासाठी प्रयत्न करणार होते. मात्र आठ दिवस झाले तरी अद्यापही वाहतूक कोंडीपासून नागरिकांना दिलासा मिळालेला नाही. यामुळे प्रशासन वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी प्रयत्न करणार आहे कि नाही असा प्रश्न उरुळी कांचन मधील नागरिकांना पडला आहे.
वाहतूक पोलीस आहेत नावाला, काम करतात कुण्या गावाला?
पुणे-सोलापूर महामार्गावर हडपसर, लोणी काळभोर व उरुळी कांचन पोलीस ठाण्यातील वाहतूक पोलिसांच्या वाहतूक नियमन करण्यासाठी ठिकठिकाणी नियुक्त्या करण्यात आलेल्या आहेत. वाहतूक पोलीस सुरक्षेच्या दृष्टीकोनातून जर उपाययोजना करत नसतील, तर पोलीस करतात काय? असा सवाल उपस्थित होत आहे. त्यामुळे ‘वाहतूक पोलीस आहेत नावाला, काम करतात कुण्या गावाला?’ असं म्हणण्याची वेळ पूर्व हवेलीतील नागरिकांवर आली आहे.
आडोसा किंवा ‘सुरक्षित’ ठिकाणीच बस्तान..
सध्या बहुतांश चौकात वाहतूक पोलिस हे वाहतूक नियमन सोडून आडोशाला थांबत असल्याचे चित्र आहे. इतकेच नाही, तर काही वाहतूक पोलिस हे दुचाकी किंवा बाकड्यावर बसल्याचेही अनेक उदाहरणे आहेत. जर वाहतूक पोलिसच अशाप्रकारे ‘सुरक्षित’ जागा शोधत असतील, तर सर्वसामान्यांसह वाहनचालकांची सुरक्षा रामभरोसेच, असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही.
अतिक्रमणे कधी निघणार
पुणे सोलापूर राष्ट्रीय महामार्ग हा अतिक्रमणाच्या विळख्यात अडकलेला आहे. शेवाळवाडी येथे महामार्गावरच काही नागरिकांनी दुकाने थाटली आहेत. तर उरुळी कांचन येथे हातगाडी, टपरी, फळे विक्रेते व पथारी व्यावसायिकांनी रस्त्यावरच थांबून विक्री चालू केली आहे. तसेच रिक्षा चालकांनी ठिकठिकाणी महामार्गावर अनधिकृत थांबा तयार केला आहे. त्यामुळे येथील अतिक्रमणे कधी निघणार? व पुणे सोलापूर महामार्ग मोकळा श्वास कधी घेणार? असा सवाल नागरिकांनी उपस्थित केला आहे.
यावेळी कुंजीरवाडीचे माजी सरपंच सचिन तुपे म्हणाले, दोन दिवसापूर्वी थेऊर फाटा येथे महामार्गावरच टेम्पो बंद पडल्यामुळे या महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी झाली होती. मात्र त्या ठिकाणी कोणताही वाहतूक पोलीस आढळून आला नाही. त्यामुळे बंद पडलेला टेम्पो छावणीतील पोलिसांनी स्थानिक नागरिकांच्या सहाय्याने रस्त्यातून बाजूला काढला. आणि महामार्ग मोकळा करून वाहतूक कोंडी सुरळीत केली. त्यामुळे येथील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी जादा वाहतूक पोलिसांच्या नेमणुका कराव्यात.
याबरोबर कुंजीरवाडीचे विशाल वाईकर म्हणाले, एका अल्पवयीन मुलाला झटके आल्याने तो बेशुद्ध अवस्थेत पडला होता. त्याला लवकर उपचार मिळावेत म्हणून लोणी काळभोर येथील विश्वराज हॉस्पिटलमध्ये घेऊन चाललो होतो. दरम्यान, आळंदी म्हातोबाची चौकात अतिक्रमणे व रस्त्यावर पार्क केलेल्या गाड्यांमुळे रविवारी दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली होती. रुग्णाला दवाखान्यात पोहोचवण्यासाठी धडपड सुरू होती. मात्र अनधिकृत अतिक्रमणे व रस्त्यावर पार्क केलेल्या वाहन चालकांना विनंती करत होतो. मात्र त्या ठिकाणी दुकानदार व वाहन चालक अरेरावीची भाषा करीत होते. कशीतरी विनंती करून वाहतूक कोंडीतून गाडी तब्बल अर्ध्या तासानंतर बाहेर काढली. आणि मुलाला रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. पोलीस प्रशासन, एनएचआय व अतिक्रमण विभाने त्वरित दखल घेऊन अनधिकृत पार्किंग, दुकानदार व हातगाड्यांवर त्वरित कारवाई करावी.