पुणे : गेल्या दोन दिवसांपासून महाराष्ट्रातील (Maharashtra) अनेक भागात तापमानाचा (Temperature) पारा 40 अंश सेल्सिअसच्या वर गेला आहे. हवामान विभागाच्या आकडेवारीनुसार, राज्याच्या पश्चिम आणि मध्य भागात सर्वाधिक उच्च तापमानाची नोंद झाली आहे. राज्यातील सर्वाधिक तापमान पुण्यात (Pune) झाले असून तापमानाच्या बाबतीत पुण्याने चंद्रपुरला देखील मागे टाकले आहे.
पुण्यात तापमानामुळे पुणेकरांच्या जीवाची लाहीलाही होत असताना पुढील दोन दिवस उष्णतेची लाट येणार असल्याचे हवामान खात्याने सांगितले आहे. राज्याच्या बहुतांश भागांमध्ये उष्णतेचा तडाका अधिक जाणवत आहे. तर काही भागांना मात्र अवकाळी पावसाचा मारा सोसावा लागत आहे. एकंदर राज्यातील हवामानाची स्थिती सातत्याने बदलत आहे. इथं मान्सूनची प्रतीक्षाही शिगेला पोहोचली आहे.
पुढील 24 तासांसाठी राज्याच्या उत्तर कोकण, मध्य महाराष्ट्र भागामध्ये उष्णतेची लाट येण्याचा इशारा असून, मराठवाडा आणि विदर्भाच्या जिल्ह्यांमध्ये एक किंवा दोन ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळ आणि सोसाट्याचा वारा (30-40 किमी प्रतितास वेग) हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे. हवामान विभागानं वर्तवलेल्या अंदाजानुसार कोकणातील तुरळक क्षेत्रात उष्ण आणि दमट परिस्थिती राहण्याची शक्यता आहे. मुंबईच्या हवामानाचा आढावा घ्यायचा झाल्यास शहर आणि उपनगरात आकाश मुख्यतः निरभ्र राहील. शहर आणि उपनगरात काही ठिकाणी उष्णतेची लाट निर्माण होण्याची शक्यता आहे.
सध्याच्या घडीला राज्यात सूर्य आग ओकत असून, महाराष्ट्रातील बहुतांश जिल्हे 40°c च्या पलिकडे पोहोचले आहेत. सोलापूरात तापमान 44°c वर गेलं असून, ठाणे जिल्ह्यात तापमान 42 अंश सेल्सिअस वर गेलं आहे. पुण्यात तापमानाचा आकडा 41.7 अंश सेल्सिअस, मालेगावात 43 अंश तर, संभाजीनगरचा पारा चाळीस अंशाच्याही पलिकडे पोहोचला आहे.
पुण्यातील काही भागातील तापमान
कोरेगाव पार्क : 42.9 अंश सेल्सिअस
पुरंदर : 42.7 अंश सेल्सिअस
राजगुरुनगर : 42.5 अंश सेल्सिअस
इंदापूर : 42.5 अंश सेल्सिअस
ढमढेरे : 44.0 अंश सेल्सिअस
शिरूर : 43.9 अंश सेल्सिअस
मगरपट्टा : 43.0 अंश सेल्सिअस
वडगावशेरी : 42.9 अंश सेल्सिअस
हडपसर : 42.1 अंश सेल्सिअस
चिंचवड : 41.7 अंश सेल्सिअस
शिवाजीनगर : 41.7 अंश सेल्सिअस
बारामती : 41.1 अंश सेल्सिअस