पिंपरी : गावठी दारुची वाहतूक होत असल्याप्रकरणी राज्य उत्पादन शुल्कच्या ‘फ’ (पिंपरी-चिंचवड) विभागाकडून मोठी कारवाई करण्यात आली. या कारवाईमध्ये चारचाकी टेम्पोसह ३७५ लिटर गावठी दारु, असा पाच लाख ३९ हजार ६०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. पिंपरीतील कुदळवाडी येथे शनिवारी (दि. २७) ही कारवाई केली.
राज्य उत्पादन शुल्कच्या ‘फ’ विभागाचे निरीक्षक संदीप मोरे यांनी दिलेल्या माहितीनुसार, पिंपरी चिंचवडमधील कुदळवाडी येथे एका चारचाकी टेम्पोमधून हातभट्टीच्या गावठी दारुची वाहतूक होणार असल्याची माहिती प्राप्त झाली होती. त्यानुसार उत्पादन शुल्कच्या फ विभागाकडून सापळा रचण्यात आला होता. त्यावेळी एका संशयित टेम्पोला थांबवून तपासणी केली असता त्यामध्ये प्लास्टिक कॅनमध्ये ३७५ लिटर गावठी दारू मिळून आली. गावठी दारू व टेम्पो असा पाच लाख ३९ हजार ६०० रुपयांचा मुद्देमाल राज्य उत्पादन शुल्कच्या पथकाने जप्त केला आहे.
दरम्यान, राज्य उत्पादन शुल्कच्या फ विभागाने आणखी दोन मोठ्या केल्या. पहिल्या कारवाईत एक संशयित दुचाकीस्वाराला थांबवून चौकशी केली असता बिअर आणि विदेशी मद्य मिळून आले. ते मद्य आणि दुचाकी असा एूण ५३ हजार ७८० रुपयांचा मुद्देमाल पथकाने जप्त केला. त्यानंतर दुसऱ्या कारवाईत एका संशयित चारचाकी गाडीची तपासणी केली असता त्यामध्ये १७५ लिटर गावठी दारु मिळून आली. या गावठी दारु आणि चारचाकी वाहन असा एक लाख आठ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. राज्य उत्पादन शुल्कच्या ‘फ’ विभागाचे निरीक्षक संदीप मोरे, दुय्यम निरीक्षक माधवी गडदरे, संतोष कोतकर, सहायक दुय्यकम निरीक्षक डी. के. पाटील यांच्या पथकाने ही कामगिरी केली.