भिगवण : येथील श्री.भैरवनाथ महाराजांची यात्रा (Bhairavnath Maharaj Yatra) ही एक आणि दोन मे रोजी होणार आहे. कालाष्टमीच्या दिवशी दरवर्षी प्रमाणे ही यात्रा मोठ्या उत्साहात पार पाडण्यासाठी योग्य नियोजन केले असून, जुने व नवीन गावातील भैरवनाथ मंदिर येथे आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. तसेच मंदिर व परिसरातील आणि पालखी मार्गावरील साफसफाई, स्वच्छता केली आहे. तसेच या मार्गावर लाईटची व्यवस्था करण्यात आली आहे.
एक मे रोजी मध्यरात्री बारा वाजल्यापासून महिलांचे दंडवत घेणे सुरू होणार आहेत. सकाळी सात वाजता भैरवनाथ मंदिरामध्ये अभिषेक होईल, त्यानंतर दिवसभर प्रसाद व शेरणी वाटप होणार आहे. रात्री नऊ वाजता पालखी, छबिना मिरवणूक निघणार आहे, तदनंतर रात्री अकरा वाजता फटाक्यांची आतिषबाजी (दारुगोळा) होणार आहे आणि रात्री बारा वाजता लाखात देखणी हा मनोरंजनाचा कार्यक्रम होणार आहे.
तसेच दोन मे रोजी सकाळी भैरवनाथ मंदिर येथे मानपान देण्याचा कार्यक्रम झाल्यानंतर कुस्त्यांचा आखाडा पूजन होणार आहे. त्यानंतर हजेरीसाठी अहो नादच खुळा हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. सायंकाळी चार वाजता कुस्त्यांचे जंगी मैदान भरणार असून भिगवण परिसरातील नामांकित मल्ल याठिकाणी कुस्तीसाठी उपस्थित राहणार आहेत. तसेच तीन मे रोजी महिलांसाठी लावण्याची अप्सरा हा ऑर्केष्ट्राचा कार्यक्रम होऊन यात्रेची सांगता होणार असल्याची माहिती सरपंच दिपीका क्षीरसागर, उपसरपंच मुमताज शेख आणि संयोजक अशोक काटे यांनी दिली.