पुणे : गेल्या काही दिवसांमध्ये शहरात अल्पवयीन मुलींवरील विनयभंगाच्या घटनांमध्ये वाढ झाल्याचे पाहायला मिळत आहे. एकाच दिवशी वेगवेगळ्या ठिकाणी तीन विनयभंगाच्या घटना घडल्या आहेत.
शहरातील पहिली घटना ही सदाशिव पेठ भागातील आहे. तेथील एका सोसायटीमध्ये आरोपीने 16 वर्षाच्या अल्पवयीन मुलीला शाळेतील वर्कशॉप करीता लागणारे साहित्य खरेदी करण्यासाठी रविवार पेठमध्ये नेले. त्यानंतर त्याचा जेवणाचा डबा घेण्याचा बहाणा करुन मुलीला त्याच्या घरी घेऊन गेला. त्यावेळी तिच्याशी जवळीक साधून मला किस देतेस का? असे म्हटल्याने मुलीने तुम्हाला बायको आणि बाळ असल्याचे सांगितले. परंतु माणसाला फिलिंग असल्याचे सांगत त्याने त्या मुलीचा विनयभंग करण्याचा प्रयत्न केला. याप्रकरणी मंगेश गायकवाड या आरोपीवर विश्रामबाग पोलिस स्टेशन येथे भा.दं.वि.कलम 354 आणि 354 (अ) आणि पोस्कॉ 8 व 12 कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दुस-या घटनेत बापानेच मुलीबरोबर अश्लील कृत्य केल्याने बापाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पीडित मुलीच्या आईनेच समर्थ पोलीस स्टेशनमध्ये यासंबंधी फिर्याद दिली आहे. नवरा दारु पिऊन मुलीला मारहाण करीत असे, असेही फिर्यादीत म्हटले आहे.
तसेच तिसरी घटना ही मांजरी बुद्रुक येथील पीडित मुलीच्या राहत्या घरी जाऊन आरोपीने विनयभंग केल्याची आहे. ही घटना घडल्यानंतर पीडित मुलीने हडपसर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. निखिल शिरीष थोरात (वय 19) असे मुलाचे नाव आहे. फिर्यादीचे आई वडील दोघेजण कामानिमित्त घराबाहेर गेले होते. फिर्यादीचा भाऊ हा पाणी आणण्याकरीता घराबाहेर गेला होता. शेजारी राहणारा ओळखीचा मुलगा मुलीच्या घराच्या दरवाज्यापाशी आला आणि तू मला खूप आवडतेस, मला तुझ्यासोबत लग्न करायचे आहे असं म्हणाला. तेवढ्यात फिर्यादीचा भाऊ तिथे आल्याने तिथून आरोपी पळून गेला. आरोपी सातत्याने फिर्यादीचा पाठलाग करत होता. माझ्याशी लग्न कर तुला सुखात ठेवेन, असे सातत्याने म्हणत असल्याने तरुणावर विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला.