पुणे : पुण्यातील अरण्येश्वर परिसरात एक धक्कादायक घटना घडली आहे. चेष्टामस्करीत एका तरुणाच्या पायावर पेट्रोल टाकून पेटवून दिल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकारात तरुण गंभीर जखमी झाला असून घटनेनंतर आरोपी पसार झाला आहे. हा प्रकार १८ एप्रिल रोजी रात्री साडे अकरा वाजण्याच्या सुमारास अण्णाभाऊ साठेनगर, अरण्येश्वर रोड येथे घडला. याप्रकरणी सहकारनगर पोलिसांनी दोघांवर गुन्हा दाखल केला आहे.
बापू जालिंदर खिलारे (वय-३० रा. अण्णाभाऊ साठे नगर, अरण्येश्वर) असे जखमी झालेल्या तरुणाचे नाव आहे. खिलारे याने सहकारनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरून शुभम पवार आणि मयुर भुंबे (दोघे रा. अरण्येश्वर) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी आणि फिर्यादी खिलारे एकमेकांच्या परिचयाचे आहेत. रात्री साडे अकरा वाजण्याच्या सुमारास बापू खिलारे हे कामावरुन घरी जात होते. त्यावेळी अरणेश्वर रोडवर त्यांच्या ओळखीचा अनिकेत कांबळे हा त्याच्या दुचाकीच्या टाकीत पाणी गेल्याने पेट्रोल आणि पाणी बाहेर काढत होता. त्यावेळी आरोपी त्या ठिकाणी गेले. आरोपी आणि फिर्य़ादी एकमेकांची थट्टामस्करी करु लागले.
आरोपी शुभम याने काडी पेटवून फिर्यादी यांच्या पायाला चटके देण्यास सुरुवात केली. त्यानंतर आरोपी मयुर भुंबे याने बाटलीत काढलेले पेट्रोल बापु खिलारे याच्या पायावर टाकले. तर शुभमने पेटती काडी फिर्य़ादी यांच्या पायावर टाकली. यामुळे पेट्रोलने पेट घेतल्याने आग लागली. स्थानिक लोकांनी गोधडी टाकून आग विझवली. या घटनेत बापु खिलारे जखमी झाला असून आरोपीने पळ काढला. पुढील तपास पोलीस करीत आहेत.