राहुलकुमार अवचट
यवत : यवत परिसरात आज दुपारी साडे चार वाजण्याच्या सुमारास अचानक ढगांच्या गडगडाटासह अवकाळी पावसाने हजेरी लावली. सकाळपासून प्रचंड उकाडा व उष्णतेचे वातावरण होते. त्यामुळे पाऊस पडण्याची शक्यता नसतानाही अचानक पावसाने हजेरी लावल्याने अनेकांची तारांबळ उडाली. दरम्यान, आज लग्नाची मोठी तारीख असल्याने अनेक वऱ्हाडी व नागरिकांकडे छत्री, रेनकोट नसल्याने अनेकांना पावसात भिजावे लागले.
यवत बाजारपेठेतील मुख्य रस्त्यावर असलेले फ्लेक्स वादळी वाऱ्यात कोसळल्याने विक्रेते तसेच व्यापाऱ्यांनाही याचा काही प्रमाणात फटका बसला. विजेचा प्रचंड कडकडाट चालू असतानाच सोसाट्याच्या वाऱ्यामुळे विक्रेत्यांचे काही प्रमाणात नुकसान झाले. तसेच काही ठिकाणी झाडे देखील पडली. पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील सेवा रस्त्यावर आणि गावातील अनेक रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात पाणी साचले. यवत पोलीस स्टेशन जवळील पुलाखाली मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याने अनेकांची वाहने बंद पडली.
अवकाळी पावसाने शेतकरी चिंतेत
वातावरणातील बदलामुळे शेतकरी चिंतेत असतानाच अवकाळी पाऊस पडल्याने नुकसानीला सामोरे जावे लागणर आहे. गेला आठवडाभर उष्णतेच्या पाऱ्याने उच्चांक गाठला होता. यामुळे नागरिक हैराण झाले होते. आज दुपारी पाऊस पडल्याने वातावरणात काहीसा गारवा निर्माण झाला. त्यामुळे नागरिकांना थोडासा दिलासा मिळाला आहे.