संदीप टुले
केडगाव : दौंड तालुक्याच्या भीमा नदीपात्रातील कोरडे पडलेले बंधारे भरण्यासाठी भामा आसखेडचे सोडलेले पाणी शिरापुरा, हिंगणीबेर्डी, काळेवाडी, मलटण, राजेगाव, खानोटा, नायगाव, वाटलुज येथील नदीपात्रामध्ये न आल्याने ग्रामस्थ व शेतकरी संतप्त झाले. यंदा उजनी धरण हे 66 टक्के भरले असताना सुद्धा पाणी वाटपाचे योग्य नियोजन न झाल्यामुळे दौंड तालुक्यातील 7 गावांना पाणी कमी पडले असून, भीमा नदीपात्रही कोरडे पडले आहे.
त्यामुळे पिण्याच्या पाण्याची टंचाई निर्माण झाली आहे. तसेच शेतीसाठी पाणी कमी पडले असून, पिके जळु लागली आहे. फळबागा पाण्याअभावी सुकु लागल्या आहेत. शेतकरी म्हणाले की, 2014 पर्यंत पाणी वाटपाचे नियोजन योग्य होतं होते. त्यामुळे भिमा पट्ट्याला दुष्काळ जाणवत नव्हता. परंतु 2015 पासुन प्रत्येक वर्षी कमी अधिक प्रमाणात ही समस्या जाणवायला लागली. आता मात्र गंभीर परिस्थितीचा सामना करावा लागत आहे.
भीमा पात्रात पाणी सोडण्यासाठी दौंड पुर्व भागातील 7 गावातील शेतकऱ्यांच्या शिष्टमंडळाने पालकमंत्री अजित पवार, खासदार सुप्रिया सुळे, आमदार राहुल कुल, माजी रमेश थोरात, जलसिंचन विभाग पुणे यांच्या भेटी घेतल्या होत्या. त्यामुळे भामा आसखेड किंवा पर्यायी धरणातून पाणी सोडुन ते खानोटा राजेगावपर्यंत पाणी येईल, असे आश्वासन दिले होते. पण ते फक्त आश्वासनच राहिले आहे.
धरण उशाला अन् कोरड घशाला
2014 पर्यंत पाणी वाटपाचे नियोजन होतं होते. त्यामुळे भीमा पट्ट्याला दुष्काळ जाणवत नव्हता. परंतु 2015 पासून प्रत्येक वर्षी कमी अधिक प्रमाणात ही समस्या जाणवत आहे. यंदा उजनीत बऱ्यापैकी पाणी असताना सुद्धा योग्य नियोजनाअभावी भीमा पात्र कोरडे पडले आहे. धरण उशाला अन् कोरड घशाला अशी अवस्था भिमा पट्ट्यातील शेतकऱ्यांची झाली आहे.
भीमा पट्ट्यातील शेतकऱ्यांनी धरणासाठी आपल्या जमिनी दिल्या आहेत. त्यामुळे त्यांना समन्यायी पाणी वाटप धोरणानुसार हक्काचे पाणी मिळाले पाहिजे. त्यासाठी सर्व आजी-माजी लोकप्रतिनिधीने योग्य भुमिका घेऊन पुर्व भागात नदीपात्रात बुडित बंधारे उभारावे.
– गणेश कैलास गायकवाड, माजी सदस्य, हिंगणीबेर्डी ग्रामपंचायत, काळेवाडी
शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात वेगवेगळ्या पिकांच्या लागवडी केल्या आहेत. ती पिके जर पाण्याअभावी जळाली तर कर्ज कसे फेडायचे याची चिंता शेतकऱ्यांना लागली आहे.
– नवनाथ थोरात, माजी उपसरपंच, मलटण ग्रामपंचायत