पुणे : अनेकांच्या परीक्षा (Exam) संपल्या आहेत तर काहींच्या अजुनही सुरु आहेत. प्रत्येकजण उन्हाळी सुटीची आतुरतेने वाट पाहत असतो. त्यातच राज्याच्या शिक्षण विभागाकडून शाळांना उन्हाळी सुटी (summer vacation ) जाहीर करण्यात आली आहे. सुटी जाहीर केल्यानुसार २ मेपासून उन्हाळी सुटी सुरू होणार असून, राज्यातील शाळा १५ जूनपासून तर विदर्भातील शाळा १ जुलैपासून सुरु होणार आहेत. असे आदेश गुरुवारी (ता. १८) शिक्षण संचालकांनी काढले आहेत. तसेत पुढील शैक्षणिक वर्षाची सुरवात १५ जूनपासून होईल, असेही त्यांनी आदेशातून स्पष्ट केले आहेत.
आगामी शैक्षणिक वर्ष विदर्भ वगळता उर्वरित विभागांमधील शाळा १५ जूनपासून सुरु होतील, असे आदेश प्राथमिकचे शिक्षण संचालक शरद गोसावी, माध्यमिक व उच्च माध्यमिकचे संचालक संपत सूर्यवंशी यांनी काढले आहेत. जून महिन्यातील विदर्भातील तापमान विचारात घेता उन्हाळी सुटीनंतर तेथील राज्य मंडळांच्या सर्व शाळा ३० जूनपासून सुरु होतील. पण त्यावेळी रविवार येत असल्याने १ जुलैपासून विदर्भातील शाळा सुरू होतील, असेही त्यांनी यावेळी सांगितले आहे.
राज्यातील इतर मंडळांच्या शाळा वेळापत्रकानुसार सुरू असल्यास किंवा अशा शाळांमध्ये महत्त्वाचे शैक्षणिक उपक्रम राबवण्यात येत असल्यास विद्यार्थ्यांना सुटी जाहीर करण्याबाबत शाळा प्रशासनाने उचित निर्णय घेण्याबाबत स्पष्ट करण्यात आले आहे.