पुणे : पुण्यातील एमआयटी आर्ट, डिझाईन आणि टेक्नॉलॉजी विद्यापीठाचे कुलगुरू तथा कार्याध्यक्ष प्रा. डॉ. मंगेश तु. कराड यांच्या 58 व्या वाढदिवसानिमित्त राष्ट्रीय सेवा योजना (एनएसएस) तर्फे आयोजित भव्य रक्तदान शिबिराला विद्यार्थी तसेच शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा उदंड प्रतिसाद लाभला. या शिबिरात तब्बल 158 दात्यांनी रक्तदान करून आपली सामाजिक बांधिलकी जपण्याचा प्रयत्न केला.
या रक्तदान शिबिराचे उद्घाटन विद्यापीठाचे प्र.कुलगुरू डॉ. रामचंद्र पुजेरी यांच्या हस्ते तर कुलसचिव डॉ. महेश चोपडे, सहाय्यक कुलसचिव डॉ. विशांत चेमटे, मॅनेटचे प्राचार्य कॅप्टन प्रेरित मिश्रा, डॉ. श्रीकांत गुंजाळ, राष्ट्रीय सेवा योजनेचे समन्वयक प्रा. विशाल पाटील, प्रा. हनुमंत पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडले.
याप्रसंगी बोलताना डॉ. पुजेरी म्हणाले की, प्रा. डॉ. कराड यांच्या वाढदिवसानिमित्त दरवर्षी विश्वराज बागेत विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात येते. यंदाही अनेक उपक्रमांद्वारे साहेबांचा वाढदिवस साजरा झाला. बुधवारी (ता,17) सकाळपासूनच विद्यार्थ्यांनी स्वयंस्फूर्तीने शिबिरस्थळी दाखल होत रक्तदान केले. त्यामधून तब्बल 158 रक्त पिशव्या संकलित झाल्याचे कौतुक आणि तितकाच आनंद आहे.
बायोगॅस युनिटचेही उद्घाटन
प्रा. डॉ. कराड यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून विद्यापीठ आवारात प्रत्येकी २० किलो अन्न कचऱ्यापासून २५०० लिटर बायोगॅस क्षमता असणाऱ्या तीन युनिट्सचे उद्घाटन करण्यात आले. आता या कचरा व्यवस्थापनाच्या माध्यमातून दररोज ५ तास शेगडी चालू शकेल, इतका गॅस तयार होणार आहे. ज्या माध्यमातून तब्बल ६ मेट्रीक टन कार्बन उत्सर्जन कमी होणार आहे. तसेच, या माध्यमातून तयार होणाऱ्या गॅसचा वापर विद्यापीठाच्या स्वयंपाकघरासाठी होणार असल्याची माहिती विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. चोपडे यांनी यावेळी दिली.