सातारा : साताऱ्याचे बिग बॉस फेम अभिजीत बिचुकले हे कोणत्या ना कोणत्या कारणावरून सतत चर्चेत असतात. अशातच आता सातारा लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरणार असल्याचे अभिजित बिचुकले यांनी आज जाहीर केले आहे. त्यामुळे ते पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. येत्या १९ एप्रिल रोजी ते आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. साताऱ्यात आज अभिजीत बिचुकले यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला यावेळी त्यांनी लोकसभा निवडणूक लढवणार असल्याचे जाहीर केले.
यावेळी बोलताना अभिजित बिचुकले म्हणाले, मतदारराजा जागृत आहे. येत्या १९ एप्रिलला मी उमेदवारी अर्ज भरणार आहे. उदयनदादांची इच्छा होती ती पूर्ण झाली. पण भाजपने छत्रपतींना किती सन्मान दिला. तसेच उदयनराजेंना उमेदवारी जाहीर करायला ऐवढा वेळ का लागला? याचे आत्मपरीक्षण उदयनराजेंनी आणि लोकांनी देखील करावे, असा सल्ला अभिजीत बिचुकले यांनी दिला आहे.
त्यासोबतच विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव संसद भवनला द्या, अशी मागणी देखील त्यांनी यावेळी केली. समुद्रातील छत्रपतींचे स्मारक होण्याबाबत पाठपुरावा करणार. वैचारिक वारस म्हणून धाडस केले पाहिजे, असे मत अभिजीत बिचुकले यांनी व्यक्त केले. २ रुपयांची दारू पाजून मटण देऊन शक्ती प्रदर्शन केलं जात नाही. शरद पवार आणि उदयनराजे हार्ड वैर आहे. उदयनराजेंना पाडण्यासाठी जयंत पाटील आणि शरद पवार प्रयत्न करत आहेत, असा आरोप अभिजीत बिचुकले यांनी केला आहे.