यवतमाळ : राज्यातील मेंढपाळांनी जर मेंढ्या आणि बकरी राखायचे बंद केले तर लोकांना कुत्री कापून खायची वेळ येईल, असं वादग्रस्त वक्तव्य भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी केलं आहे. यवतामाळ-वाशिमच्या महायुतीच्या उमेदवार राजश्री पाटील यांच्या प्रचारार्थ सभेचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळी ते बोलत होते.
कायम कसल्या ना कसल्या वक्तव्यामुळे गोपीचंद पडळकर चर्चेत असतात. अशातच आता पुन्हा एकदा पडळकरांच्या वक्तव्यामुळे राजकीय वादाला तोंड फुटलं आहे अशी सध्या सर्वत्र चर्चा सुरु आहे. यवतमाळ-वाशिम लोकसभा मतदारसंघामधील महायुतीतील शिंदे गटाच्या उमेदवार राजश्री हेमंत पाटील यांच्या प्रचार सभेमध्ये त्यांनी वादग्रस्त व्यक्तव्य केलं आहे.
या आधीही भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी अनेक वादग्रस्त वक्तव्यं केली आहेत. शरद पवार आणि त्यांच्या पक्षावर टीका करताना पडळकरांनी टोकाचे शब्द वापरले होते. आताही अशाच प्रकारचं वक्तव्य केल्याने त्यावरून राजकीय वाद होतो का हे पाहावं लागणार आहे.