लोणी काळभोर, (पुणे) : शिक्रापूर-चाकण रस्त्यावर भंगार व्यावसायिकाचे अपहरण करून दरोडा टाकणा-या अट्टल टोळीला स्थानिक गुन्हे अन्वेषण (ग्रामीण) शाखेच्या पोलिसांनी अटक केली आहे.
करण उर्फ हनुमंत शिवाजी कांबळे (रा. सोळु, ता. खेड), रेहान हसन मोहम्मद खान (वय-३२, रा. करंदी रोड गॅस फाटा, शिक्रापूर ता. शिरूर), अमर दिगंबर दिवसे (वय-२०), आकाश उर्फ डुब्या सोपान पानपट्टे ( रा. दोघेही आंबेडकर नगर, ता. पूर्णा,जि. परभणी), इमरान अजीमूलला खान (वय-३० रा. गॅस फाटा खालसा धाब्याजवळ शिक्रापूर, ता. शिरूर) मारी उर्फ सुरज नागसिंध खंदारे व एक अल्पवयीन मुलगा अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.
स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक शेळके यांनी दिलेल्या महितीनुसार, सोमवारी (ता. ११) संध्याकाळी साडेनऊ वाजण्याच्या सुमारास शिक्रापूर चाकण रोडवरील भंगार व्यावसायिक नसीर अबुबकर खान (वय-१९, रा. गॅस फाटा, शिक्रापूर, तालुका शिरूर) हे रस्त्यावर थांबले होते. यावेळी अज्ञात इसमांनी चारचाकी गाडीतून त्यांचे अपहरण केले. व त्यांच्या खिशातील ५७ हजार रुपये रोख रक्कम व एक मोबाईल असा ८७ हजार रुपयांचा मुद्देमाल मारहाण करून घेऊन गेले. या प्रकरणी नसीर खान यांनी शिक्रापूर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती.
सदर प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांनी सदर घटनेच्या तपासाबाबत सूचना व मार्गदर्शन करून स्थानिक गुन्हे शाखेचे पथक नेमण्यात आले होते. सदर घटनेचा तपास करीत असताना एका खबऱ्याकडून पोलिसांना माहिती मिळाली कि, सदरचा गुन्हा हा करण उर्फ हनुमंत कांबळे याने त्याच्या साथीदारांसमवेत केला आहे. त्यानुसार करण यास फुलगाव परिसरात चिंचबन हॉटेलचे पाठीमागे शिवटेकडी जवळ पाटलाग करून ताब्यात घेतले. त्याच्याकडे चौकशी केली असता वरील साथीदारांसमवेत गुन्हा केला असल्याची कबुली पोलिसांना दिली. त्याच्या इतर साथीदारांना तुळापूररोड चिंचबन हॉटेल परिसरातून ताब्यात घेतले.