दौंड : भांडगाव (ता. दौंड) येथील एका ग्रामपंचायत सदस्याने खोर ग्रामपंचायत हद्दीत अनधिकृत गौणखनिज उत्खनन व वाहतूकीत आपले हात ओले केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. मात्र, राजकीय दबावामुळे दौंड तहसील कार्यालय कारवाई करण्याऐवजी मूग गिळून गप्प बसले आहे. त्यामुळे हे लोकप्रतिनिधी मोकाटपणे शासनाचा लाखो रुपयांचा महसूल बुडवून उजळ माथ्याने फिरत आहेत. त्यामुळे या प्रकरणात सहभागी असलेल्या लोकांच्या सातबारावर महसूली दंडाचा बोजा दाखल करावा, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.
दौंड तालुक्यातील महसूल प्रशासन निवडणुकीच्या कामात व्यस्त असल्याने खोर येथील गट नंबर ३० मध्ये मुरुम गौण खनिजाची अक्षरक्ष: लचकेतोड सुरू आहे. लाखो रुपयांचा महसूल बुडवून खुलेआमपणे गौण खनिजाचे उत्खनन व वाहतूकीचा व्यवसाय जोमात सुरू आहे. या अवैध व्यवसायात येथील एक ग्रामपंचायत सदस्यच सहभागी असल्याचे पुरावे समोर आले आहेत. राजकीय पाठबळामुळे महसूल प्रशासनावर दबाव येत असल्याने या अवैध उत्खनन व वाहतूकीवर कारवाई होत नसल्याने नागरिकांनी आश्चर्य व्यक्त केले आहे.
या अवैध प्रकराबाबत नागरिकांनी दौंड तहसील कार्यालयात तक्रार दाखल केली आहे. त्या तक्रारीची दखल घेत दौंडचे तहसीलदार अरुण शेलार यांनी महसूल पथकाला पुढील कारवाईबाबत अवगत केलेले होते. मंडल अधिकारी सोमशंकर बनसोडे, तलाठी दुशांत पाटील, सचिन जगताप व पुंडलिक केंद्रे यांच्या महसूल पथकाने पंचनामा करण्याचे सोपस्कार पार पाडले आहे. मात्र, कारवाईबाबत हात आखडता घेत कातडी बचाव धोरण स्वीकारल्याने या प्रकरणातील कुतूहल वाढले आहे.
हजारो ब्रास मुरुमाची चोरी, परंतु अद्याप गुन्हा दाखल नाही
खोर येथील गट नंबर ३० मधून हजारो ब्रास मुरुमाची खुलेआमपणे चोरी होत आहे. याकामी राजकीय वजन वापरुन महसूल विभागाच्या संगनमताने पोकलेन, जेसीबी व हायवा ट्रक या यंत्रणेचा वापर केल्याने येथील जमिनीच्या भूभागाची चाळण झाली आहे. या अवैध व्यवसायाच्या गुन्ह्यात एका ग्रामपंचायतीचा सदस्य सहभागी आहे. विशेष म्हणजे महसूलच्या काही अधिकाऱ्यांनी चिरीमिरीच्या जोरावर सदर अवैध मुरुम उपशाला बळकटी दिली आहे. त्यामुळे उघडपणे तक्रार करण्यास कोणीही धजावत नसल्याने मुरुम माफियांनी बिनदिक्कतपणे आपला उद्योग सुरू ठेवला आहे. त्यामुळे लाखो रुपयांच्या गौण खनिजाची चोरी होऊनही अद्याप प्रशासनाने गुन्हा दाखल केला नसल्याने आश्चर्य वाटत आहे.
तहसीलदार यांच्या सूचनेनुसार खोर (ता.दौंड) येथील गट नंबर ३० मधील अनधिकृत माती मिश्रीत मुरुम या उत्खननाचा तलाठ्यांच्या मदतीने पंचनामा केला आहे. त्याठिकाणी उत्खनन व वाहतूक झालेली आढळून येत आहे. पंचनामा वरिष्ठ कार्यालयास सादर केलेला आहे.
– सोमशंकर बनसोडे, मंडल अधिकारी