दौंड, (पुणे) : दौंड शहरातील कॅनरा बँकेच्या महिला शाखा अधिकाऱ्याने जनरल चार्जेसच्या नावाखाली बँकेची तब्बल पाऊणे पाच लाख रुपयांची अफरातफर करून फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. ही घटना 02 मार्च ते 25 मे 2022 दरम्यान घडली आहे. याप्रकरणी कॅनरा बँकेच्या महिला शाखा अधिकाऱ्याविरोधात दौंड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
स्मिता बिनोदकुमार रॉय (मुळ रा. 29 टाईप 4, सेक्टर 5. ए. भेल हरिद्वार, उत्तराखंड) असे फसवणूक करणाऱ्या बँकेच्या शाखा अधिकाऱ्याचे नाव आहे. याप्रकरणी राजीव एम केपी सिन्हा (वय 51, पिपंरी चिंचवड) यांनी दौंड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, स्मिता बिनोदकुमार रॉय या कॅनरा बॅंक, दौंड येथे शाखा अधिकारी म्हणून काम करीत होत्या. त्यांनी 02 मार्च ते 25 मे 2022 दरम्यान सामान्य प्रभार खर्चाचे (जनरल चार्जेस) खाते जी.एल.नंबर 420083090, 420030020 वरून आपल्या पदाचा गैरवापर करत वेगवेगळया खात्यावर 4 लाख 69 हजार 392 रूपये ट्रान्स्फर करत बँकेची अर्थिक फसवणूक केली. दरम्यान, याप्रकरणी स्मिता रॉय यांच्याविरोधात दौंड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास महेंद्र लोहार करीत आहेत.