मंडला (मध्य प्रदेश): लोकसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान मध्य प्रदेशातील एक फोटो खूपच चर्चेत आला आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या मंडला येथील निवडणूक रॅलीपूर्वी मुख्य मंचावर भाजप उमेदवार आणि केंद्रीय मंत्री फग्गन सिंग कुलस्ते यांचा फोटो फ्लेक्सवर दाखवण्यात आला होता. मात्र, कुलस्ते यांचे नाव त्यात लिहिले नव्हते. या फ्लेक्समध्ये काँग्रेसच्या अन्य नेत्यांचीही नावे न लिहिता त्यांची छायाचित्रे लावण्यात आली होती.
काँग्रेस नेते राहुल गांधी आज मंडला लोकसभा मतदारसंघातील धानोरा गावात जाहीर सभेला संबोधित करत काँग्रेस उमेदवार ओंकार सिंह मरकम यांच्या बाजूने वातावरण तयार करतील. येथे काँग्रेस खासदार राहुल गांधी यांच्या निवडणूक भाषणापूर्वी मुख्य मंचावर लावण्यात आलेल्या फ्लेक्समध्ये काँग्रेस नेत्यांसोबत केंद्रीय मंत्री आणि भाजपचे उमेदवार फग्गनसिंग कुलस्ते यांचाही फोटो लावण्यात आला होता. नंतर चूक लक्षात येताच मंचावर लावलेल्या फ्लेक्समध्ये भाजप नेते कुलस्ते यांचा फोटो पटकन झाकण्यात आला आणि त्या फ्रेममध्ये काँग्रेसचे आमदार रजनीश हरवंश सिंह यांचा फोटो चिकटवण्यात आला.
‘राहुल गांधी आज मध्य प्रदेश दौऱ्यावर’
राहुल गांधी सोमवारी मध्य प्रदेशच्या दौऱ्यावर आहेत. ते आज धानोरा (सिवनी) आणि बाणगंगा फेअर ग्राऊंड (शहडोल) येथे जाहीर सभांना संबोधित करणार आहेत. राहुल दुपारी 2 वाजता सिवनी येथे पोहोचतील. त्यानंतर दुपारी चार वाजता ते शहडोल येथील सभेला उपस्थित राहणार आहेत.