शिरूर: शिरूर तालुक्याच्या पश्चिम दिशेला ३० किलोमीटर अंतरावर निसर्गाच्या सानिध्यात वसलेले एक छोटेसे गाव आहे डिंग्रजवाडी. या गावची जेमतेम लोकसंख्या १७०० हून अधिक आहे. या छोट्याशा गावातील एका शेतकरी कुटुंबातील मुलीने एमबीबीएस परीक्षा पास होऊन गावात सर्वात प्रथम महिला डॉक्टर होण्याचा बहुमान मिळविला आहे.
डॉ. संयोगिता रामदास गव्हाणे असे एमबीबीएस परीक्षा उत्तीर्ण झालेल्या यशस्वी मुलीचे नाव आहे. आई-वडील व ५ भावंडांचे हे एकत्र गव्हाणे शेतकरी कुटुंब आहे. शेतकरी कुटुंब असतानासुद्धा मुलामुलीमध्ये कोणताही भेदभाव न ठेवता त्यांनी आपल्या गावातून मुलगी डॉक्टर व्हावी व रुग्णांची सेवा करावी, यासाठी संयोगिता हिला वारंवार प्रोत्साहन देऊन
मार्गदर्शन केले. हीच प्रेरणा घेऊन संयोगिता हिने एमबीबीएसची उच्च पदवी प्राप्त केली.
संयोगिताचे वडील रामदास गव्हाणे व आई स्वाती हे दोघेही शेती करतात. शेतीवर त्यांच्या कुटुंबाचा गाडा चालवला जातो. संयोगिता यांचे प्राथमिक शिक्षण डिंग्रजवाडी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत झाले. तर माध्यमिक शिक्षण वाघोली येथील विष्णुजी सातव हायस्कूलमध्ये पूर्ण केले. त्यानंतर तिने पुढील शिक्षण डेक्कन येथील आपटे ज्युनिअर कॉलेजमधून २०१८ मध्ये बारावी उत्तीर्ण झाली. त्यानंतर संयोगिताने खूप अभ्यास करून नीट परीक्षा दिली.
नीट परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर संयोगिताचा शासकीय कोट्यातून सोलापूर येथील अश्विनी वैद्यकीय महाविद्यालयात नंबर लागला. तिने महाविद्यालयात प्रवेश घेतला. वैद्यकीय पदवीच्या सर्व सहामाही परीक्षांमध्ये सातत्यपूर्ण कामगिरी करुन ती उत्तम गुणांनी डॉक्टर झाली आहे.
रुग्ण बरा झाल्यानंतर चेहऱ्यावरील आनंद पाहून समाधान
समाजातील गरिबातील गरीब रुग्ण वैद्यकीय उपचारापासून दूर राहता कामा नये. तसेच गरीब व श्रीमंत रुग्णांवर एकसमान उपचार मिळाला पाहिजे. हे ध्येय डोळ्यासमोर ठेऊन संयोगिता विद्याकीय क्षेत्रामध्ये उतरली आहे. दवाखान्यात रुग्ण आल्यानंतर तो आजारी अथवा त्याला वेदना होत असतात. परंतु, रुग्णावर उपचार केल्यानंतर तो बरा होतो. तेव्हा
त्याच्या चेहऱ्यावरील आनंद पाहून मनाचे खूप मोठे समाधान होते, असे संयोगिताने सांगितले.
आता होतोय कौतुकांचा वर्षाव
या यशाचे श्रेय संयोगिताने आई-वडील, कुटुंबीय, नातेवाईक, प्रसाद बोरकर, डॉ. सूळे, डॉ. अनिकेत जगताप व सर्व मार्गदर्शक शिक्षकवृंद यांना दिले आहे. तसेच या यशासाठी आध्यात्मिक गुरु हंबीर महाराज यांचे वरदहस्त मिळाल्याचेही त्यांनी सांगितले आहे. संयोगिताचे आजोळ हे लोणी काळभोर आहे. येथील तिचे मामा दिलीप भगवंतराव बोरकर व हभप श्रीकृष्ण महाराज बोरकर यांनी डॉक्टर झाल्याबद्दल तिचे अभिनंदन केले. तसेच पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
एमबीबीएस करणाऱ्यांनी अभ्यासामध्ये सातत्य ठेवावे
याबाबत ‘पुणे प्राईम न्यूज’शी बोलताना डॉ. संयोगिता गव्हाणे म्हणाल्या की, ‘स्पर्धा परीक्षा असो वा कोणतीही परीक्षा असो विद्यार्थ्यांनी मोठी स्वप्ने बघितली पाहिजेत. ही स्वप्ने सत्यात उतरण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. त्यासाठी विद्यार्थ्यांनी सोशल मीडियाचा केवळ अभ्यासासाठी योग्य वापर केला पाहिजे. एमबीबीएसचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांनी या क्षेत्रात आल्यानंतर तुम्हाला अभ्यासामध्ये सातत्य ठेवावे लागणार आहे. त्याचबरोबर आई-वडिलांनी केलेले कष्ट जर तुम्ही डोळ्यासमोर ठेवले तर तुम्हाला यश नक्की मिळेल’.