मुंबई: आगामी लोकभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस- शरदचंद्र पवार पक्षाकडून दोन उमेदवारांची घोषणा करण्यात आली. या यादीमध्ये दोन उमेदवारांचा समावेश आहे. बीड लोकसभा मतदारसंघामधून बजरंग सोनावणे तर भिवंडीतून सुरेश म्हात्रे उर्फ बाळ्यामामा यांना लोकसभेची उमेदवारी घोषित करण्यात आली आहे. दुसऱ्या यादीत फक्त दोनच नावांचा समावेश आहे. याआधी पहिल्या उमेदवार यादीत राष्ट्रवादी काँग्रेस-शरदचंद्र पवार पक्षाने 5 उमेदवार जाहीर केले होते. त्यानंतर आता नव्याने दोन उमेदवारांची घोषणा करण्यात आली आहे.
बीड लोकसभा मतदारसंघातून शरद पवार यांच्या राष्ट्रवादीकडून उमेदवारी मिळवण्यासाठी शिवसंग्रामच्या प्रमुख ज्योती मेटे आणि बजरंग सोनावणे हे दोघेजण इच्छूक होते. गेल्या लोकसभा निवडणुकीत बजरंग सोनावणे यांनी माजी मंत्री प्रीतम मुंडे यांना जोरदार टक्कर दिली होती. ज्योती मेटे यांच्यापेक्षा बजरंग सोनावणे यांच्याकडे निवडणूक लढवण्यासाठी असलेली यंत्रणा आणि क्षमता हे पाहूनच सोनावणे यांना बीडमधून उमेदवारी मिळाली आहे. त्यामुळे बीडमध्ये आता पंकजा मुंडे विरुद्ध बजरंग सोनावणे अशी थेट लढत होणार आहे.
तर भिवंडी लोकसभा मतदारसंघासाठी शरद पवार यांच्याकडे सुरेश म्हात्रे उर्फ बाळ्यामामा यांच्यासारखा तगडा उमेदवार आहे. भारतीय जनता पक्षाचे विद्यमान खासदार कपिल पाटील यांना कडवी टक्कर देण्यासाठी बाळ्यामामा हे योग्य उमेदवार असल्याची अनेकांची भावना आहे. त्यामुळेच शरद पवार यांच्या राष्ट्रवादीने सुरेश म्हात्रे यांना रिंगणात उतरवले आहे. त्यामुळे आता केंद्रीय मंत्री कपिल पाटील आणि बाळ्यामामा यांच्यातील लढाईत कोण बाजी मारणार, हे येणाऱ्या काळात स्पष्ट होईल.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष- शरदचंद्र पवार पक्षाच्या उमेदवारांची यादी
- अमर काळे- वर्धा
- भास्करराव भगरे-दिंडोरी
- सुप्रिया सुळे- बारामती
- डॉ. अमोल कोल्हे-शिरूर
- निलेश लंके-अहमदनगर
- बजरंग सोनवणे -बीड
- सुरेश म्हात्रे- भिवंडी