गणेश सुळ
केडगाव : दौंड तालुक्याच्या दक्षिण भागातील पडवी, देऊळगाव गाडा, खोर आणि भांडगावच्या यात्रोत्सवाला सुरुवात होत आहे. मात्र, यावर्षी गावांच्या यात्रा उत्साहावर पाणीटंचाईचे मोठे संकट उभे राहिले आहे. पिण्यासाठी पाणी नसल्याने यावर्षी यात्रा कशाप्रकारे पार पडतात हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. कडक उन्हाळा सुरू झाला असून पाण्याची मोठी टंचाई निर्माण झाली आहे.
वरवंड येथील व्हिक्टोरिया तलाव पूर्णतः कोरडा पडल्याने दक्षिण भागातील पाणी पुरवठा पूर्णतः बंद झाला आहे. राज्य शासनाने ’हर घर जल’ योजना अंमलात आणली. मात्र ही योजना वेळेत पूर्ण न झाल्याने आज दौंड तालुक्याच्या दक्षिण भागाला पाणी टंचाईचा मोठा फटका बसला आहे.
शेती तर बाजूलाच मात्र, नागरिकांना पिण्यासाठी पाणी नसल्याने मोठी वणवण करण्याची वेळ आली आहे. दौंड पंचायत समितीच्यावतीने तहसीलदार व गटविकास अधिकारी यांनी दुष्काळी परिस्थितीची पाहणी केली होती. या टंचाईग्रस्त गावांना टँकर सुरू करण्याच्या संदर्भात प्रांत विभागाला मागणी केली होती. त्यानुसार खोर गावाला पाण्याचे टँकर सुरू करण्यात आले आहेत, तर पडवी व जिरेगावला देखील येत्या दोन दिवसात टँकर सुरू करणार असल्याचे गटविकास अधिकारी प्रशांत काळे यांनी सांगितले आहे.
पुरंदर उपसासिंचन योजनांचे पाणी तरी सोडा, अशी हाक खोर परिसरातील नागरिक करीत आहेत. पुरंदर उपसा योजनेतून खोरच्या डोंबेवाडी पाझर तलावात एक उन्हाळी आवर्तन सोडले गेले तर किमान दोन महिन्यांचा शेतीचा पाणीप्रश्न मार्गी लागेल, अशी माफक अपेक्षा या भागातील शेतकरी वर्गाची आहे.