दिल्ली : दिल्लीतील कथित दारू धोरण घोटाळा प्रकरणी ईडीने दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना अटक केली आहे. ही अटक बेकायदेशीर असल्याचा दावा आम आदमी पक्षाने केला आहे. यासंदर्भात दिल्ली हायकोर्टात याचिका देखील दाखल केली आहे. या याचिकेवर आज बुधवारी सकाळी साडे दहा वाजता सुनावणी होणार आहे. त्यामुळे केजरीवाल यांना जामीन मिळणार का? याकडे सर्वांचं लक्ष लागून राहिले आहे.
२१ मार्च रोजी ईडीने अरविंद केजरीवाल यांना त्यांच्या दिल्लीतील निवास्थावरून ताब्यात घेतलं होतं. यानंतर त्यांना शुक्रवारी राऊस ॲव्हेन्यू कोर्टात हजर करण्यात आले. अरविंद केजरीवाल यांची चौकशी करण्यासाठी ईडीने १० दिवसांची न्यायालयीन कोठडी मागितली होती. मात्र, न्यायालयाने ईडीची ही मागणी अमान्य करत केजरीवाल यांना २८ मार्चपर्यंत ६ दिवसांचीच न्यायालयीन कोठडी दिली.
दरम्यान, ईडीने केलेल्या अटकेला आणि ट्रायल कोर्टाने दिलेल्या रिमांड आदेशाला केजरीवाल यांनी दिल्ली उच्च न्यायालयात आव्हान दिले आहे. त्यांच्या वकिलाने सरन्यायाधीशांकडे तातडीने सुनावणीची मागणी केली होती. मात्र, उच्च न्यायालयाने यावर तातडीची सुनावणी घेण्यास नकार देत या प्रकरणाची सुनावणी २७ मार्चला होईल, असं स्पष्ट सांगितलं होतं.
त्यानुसार आज केजरीवाल यांच्या याचिकेवर दिल्ली हायकोर्टात सुनावणी पार पडणार आहे. अरविंद केजरीवाल यांच्या वतीने ज्येष्ठ वकील अभिषेक मनु सिंघवी बाजू मांडणार आहेत. त्यामुळे केजरीवाल यांना दिलासा मिळणार का? याकडे सर्वांचं लक्ष लागले आहे.